www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दिलीप प्रभावळकरांचा चित्रपट म्हटलं की, सर्वांनाच आनंद... गेल्या काही महिन्यांपासून दिलीप प्रभावळकरांच्या अभिनयाचा आस्वाद सगळ्यांना मिळतोय. नारबाची वाडी, पोस्टकार्ड आणि आजोबानंतर या शुक्रवारी प्रभावळकरांचा ‘जयजयकार’ हा सिनेमा रिलीज झालाय. चित्रपटाचं दिग्दर्शन शंतनू रोडे या तरुण लेखकानं केलंय. त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे.
‘जयजयकार’ हा चित्रपट तृतीयपंथीयांच्या भोवती आखलेला आहे. शंतनू रोडे या दिग्दर्शकाचा मूळ पिंड लेखकाचा आहे. त्यामुळं कोणती गोष्ट किती खोलात जाऊन सांगायची याची जाण त्यांना आहे. दिग्दर्शक म्हणून पदार्पण करताना हे बाब त्यांनी पुरती लक्षात ठेवली आहे.
चार तृतीयपंथीय आणि एक माजी मेजर यांची गोष्ट ‘जयजयकार’मध्ये मांडली आहे. यातल्या साध्या स्टोरीटेलिंगमुळं सिनेमा सुटसुटीत बनला आहे.
चित्रपटाची पटकथा
मेजर अखंड (दिलीप प्रभावळकर) हे एक निवृत्त मेजर आहेत. गावात ते एकटेच मनमुराद जगतात. प्रचंड उत्साही आणि ऊर्जेनं भरलेलं असं हे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या खुशमस्कऱ्या स्वभावाला त्यांच्या वयाचे त्यांचे शेजारी खरं तर वैतागलेत. पण, त्याचं मेजरना काही वाटत नाही. अशा वेळी अचानक त्यांच्या आयुष्यात चार तृतीयपंथीय येतात आणि मेजर हवालदिल होतो. आणि त्यानंतर काय होतं हे ‘जयजयकार’मध्ये दाखवण्यात आलंय.
कलाकार आणि भूमिका
चित्रपटात चार तृतीयपंथींची भूमिका संजय कुलकर्णी (मौसी), भूषण बोरगावकर (चंपा), धवल पोकळे (राणी), आकाश शिंदे (लाजो) यांनी केलीय. या चौघांनीही आपल्या भूमिकेची गंमत होणार नाही, याची काळजी घेतली आहे. कोणताही अश्लिल आविर्भाव न आणता भूमिका जास्तीत जास्त खरी वाटेल याकडे त्यांनी लक्ष दिलंय.
तर दिलीप प्रभावळकरांबद्दल काय बोलावं. त्यांनी मेजरची भूमिका खूप अचूक आणि ताकदीनं साकारलीय. त्यांची देबबोली, विनोद बुद्धी सर्वांनीच ते खाऊन टाकतायेत.
कलाकार, लेखन यांची भट्टी योग्य जमली असली, तरी छायांकन मात्र प्राथमिक बनलं आहे. पटकथेत अनेक प्रसंग आणून ती जास्तीत जास्त `हॅपनिंग` बनवण्याकडे लेखकानं विशेष लक्ष दिलं आहे. संगीतही ठीकठाक. यातले काही संवाद मात्र छान जमलेत.
एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न या सिनेमातून दिग्दर्शकानं केला आहे. उत्तम विषय, सर्मपक मांडणीतून दिग्दर्शकाचे कौशल्य दिसून येते. सामान्यांच्या आजूबाजुला दिसणारे तृतीय पंथीय, त्यांच्यातील कौशल्यांकडे किंबहूना त्यांना व्यक्ती म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन प्रगल्भ करणारा हा चित्रपट आहे. कलावंतांची निवड अचूक झाल्यानं विषयाला विशेष न्याय मिळाला आहे. चित्रपटातील प्रत्येक फ्रेम योग्यरित्या मांडली गेली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.