www.24taas.com, जालना
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आपण केंद्राला साकडं घालणार आहोत, असं आश्वासन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मराठवाड्याला दिलंय. ते जालन्यात बोलत होते.
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार रविवारपासून मराठवाड्यातल्या दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर आले आहेत. पवार जालना जिल्ह्यातल्या अंबड इथं त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला. यावेळी ‘हे आंदोलनाचे दिवस नाहीत, सर्व पक्षांनी एकत्र येऊन दुष्काळाच्या प्रश्नावर काम करावं’ असं म्हणत शरद पवारांनी सर्वपक्षीय नेत्यांनाही आवाहन केलंय. तसंच दुष्काळ ग्रस्तांच्या मदतीसाठी आपण स्वत: केंद्रात प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी आश्वासन दिलंय.
भीषण दुष्काळाच्या निमित्तानं विविध पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी या भागात दौऱ्याचं सत्र सुरु केलंय. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर आता केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारही मराठवाड्याच्या दौऱ्यावर दाखल झालेत. तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही लवकरच या भागात दौरा करणार आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी आणि सामान्य जनता आता सरकारी मदतीकडे डोळे लावून बसली आहे. पण आता त्यांना मदत मिळतेय, की फक्त आश्वासन हे लवकरच कळेल.