www.24taas.com, हैदराबाद
दिलसुखनगर येथील बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणचं `CCTV` फूटेज पोलिसांना मिळाले आहे. `CCTV`मधला `तो` सायकलस्वार कोण? याची माहिती मिळत नाही. असे असले तरी या स्फोटाविषयी माहिती देणाऱ्याला दहा लाख रूपयांचं बक्षिस देण्याचे जाहीय करण्यात आले आहे. तशी माहिती हैदराबाद पोलीस आयुक्तांनी दिली.
दरम्यान, हैदराबाद स्फोटांना दोन दिवस उलटून गेले असताना आंध्र प्रदेश सरकारनं अत्यंत महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याचं म्हटलंय. तपासासाठी १५ टीम्स तयार करण्यात आल्याचं आंध्रच्या गृहमंत्र्यांनी सांगितलंय.
परिसरातील सीसीटीव्हीच्या वायर अतिरेक्यांनी आधीच कापल्याची बातमी निराधार असल्याचा दावाही हैदराबादचे पोलीस आयुक्त अनुराग शर्मा यांनी केला आहे. दिलसुखनगरमध्ये गुरूवारी झालेल्या स्फोटानंतर पहिल्यांदाच हैदराबादच्या पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन स्फोटाविषयी माहिती दिली.
दिलसुखनगर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं असून त्याची तपासणी सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. गुरूवारी रात्री झालेल्या दोन बॉम्बस्फोटात तब्बल १६ जणांचा बळी गेला तर १७७ जखमी असल्याची माहितीही त्यांनी दिली. जखमींवर सरकारी खर्चाने वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
एसआयटीने या स्फोटाच्या तपासासाठी सहा वेगवेगळी पथके स्थापन केली आहेत. हैदराबाद पोलिसांची एसआयटी अतिरिक्त पोलिस आयुक्त (क्राईम) संदीप शांडिल्य यांच्या नेतृत्वाखाली या स्फोटांचा तपास करत आहे.
या स्फोटाचा तपास करत असलेल्या एनआयए सारख्या केंद्रीय तपास संस्थेशी समन्वय ठेवत घटनास्थळी सापडलेले पुरावे, अवशेष यांचाची एसआयटी तपास घेत आहे. घटनास्थळावरचे प्रत्यक्षदर्शींच्या चौकशीला एसआयटीने सुरूवात करण्यात आलीय. अतिरेक्यांनी बॉम्ब बनवण्यासाठी अमोनियम नायट्रेट आणि प्रत्यक्ष स्फोटासाठी टायमरचा केल्याचं पोलिस आयुक्त शर्मा यांनी स्पष्ट केलं.