पाणी सोडल्याचा निषेध; 'हाय-वे' केला बंद

हजारो पोलिसांच्या कडक बंदोबस्तात सीना-कोळेगाव धरणातून सोलापूरसाठी पाणी सोडण्यात आलं. पण, त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद नॅशनल ‘हाय-वे’वर रास्ता रोको केला.

Updated: May 27, 2012, 07:35 PM IST

 www.24taas.com, उस्मानाबाद

 

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सीना-कोळेगाव पाणीप्रश्न तीव्र होत चाललाय. आज सकाळी या धरणातून सोलापूरसाठी पाणी सोडण्यात आलं होतं. हजारो पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हे पाणी सोडण्यात आलं. पण, त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद नॅशनल ‘हाय-वे’वर रास्ता रोको केला आहे. या रास्ता रोकोमुळे ४ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.

 

सीना कोळेगाव धरणातून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नागरिकांचा पाणी सोडण्याला विरोध करत शेकडो कार्यकर्ते धरणावर चाल करून गेले. पोलिसांनी खबरदारी म्हणून स्थानिक नेत्यांसह २०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. सोलापूरला पाणी सोडण्याच्या निषेधार्थ सर्वपक्षांनी परांडा बंद पुकारला आहे. त्यामुळं तणावाचं वातावरण आहे. धरण परिसरात सीआरपीएफच्या दोन तुकड्या तसंच दोन हजारपेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. यामुळं धरणाच्या परिसराला छावणीचं स्वरुप आलंय. धरणाकडे  येणारे  सर्व रस्ते बंद करण्यात आले. तब्बल दोन हजार आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या. परांडा आयटीआय कॉलेडमध्ये तात्पुरत्या कारागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळं आंदोलक नेते आणि शेतकरी भूमीगत झाले आहेत. पोलीस दडपशाही करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय.

 

सीना-कोळेगाव धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले असून आता दररोज १२०० ते १५०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार आहे. पुढील आठ ते दहा दिवस असे पाणी सोडले जाणार आहे. २ टीएमसी पाणी सीना कोळेगाव धरणातून सोलापूराला दिले जाणार आहे. पाणी सोडल्याने नदीकाठच्या नागरिकांना सकर्कतेचा इशारा देण्यात आलाय.