Buy or rent a house : स्वत:चं घर खरेदी करणं हे अनेकांचच स्वप्न असतं. त्या स्वप्नांसाठी तशीच धडपडसुद्धा केली जाते. पण, अनेकदा वस्तुस्थिती मात्र घर खरेदीचं हे स्वप्न साकार होऊ देत नाही. सातत्यानं बदलणारी आर्थिक स्थिती हे यामागचं मुख्य कारण ठरतं. त्यातच घरांच्या वाढत्या किमती या स्वप्नापासून आपल्याला नकळत दूर लोटू लागतात. सरतेशेवटी भाड्याच्याच घरात राहण्याचा पर्याय नाईलाजानं निवडावा लागतो.
घर खरेदी करण्याच्या वेळी महत्त्वाची आणि लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे तुम्हाला त्या घराचा EMI अर्थात हप्ता पुढील कैक वर्षांसाठी भरावा लागू शकतो. उदाहरणार्थ, तुमच्या घराची किंमत आहे 1 कोटी रुपये. या घराचं मासिक भाडं आहे 22000 रुपये. दोन महिन्यांची सिक्टोरिटी किंमत जोडल्यास ही रक्कम पोहोचते 44000 रुपयांवर. तुम्ही जर हे घर खरेदी करू इच्छिता तर, त्यासाठी किमान 25 टक्के रक्कम अर्थात 25 लाख रुपये डाऊन पेमेंट म्हणजेच अनामत रकमेस्वरुपात द्यावे लागतात. म्हणजेच तुम्हाला 75 लाख रुपयांचं कर्ज घ्यावं लागेल.
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बँक तुम्हाला 20 वर्षांचं कर्ज साधारण 8.5 ते 10 टक्क्यांवर देऊ शकते. म्हणजेच तुम्हाला दर महिन्याला 65000 ते 70000 रुपये इतका हप्ता द्यावा लागेल. म्हणजेच 20 वर्षांमध्ये तुम्ही साधारण 1.60 कोटी इतकी रक्कम भरण्यास बांधिल असाल.
तुम्ही जर हेच घर भाड्यानं घ्यायचा विचार करत आहात तर, 20 वर्षांमध्ये तुम्हाला साधारण 1.61 कोटी रुपये इतकं भाडं द्यावं लागेल. दरवर्षी या भाड्यात 8 ते 10 टक्के वाढ होईल ही बाब महत्त्वाची. सुरुवातीला भाड्याचं घर अतिशय स्वस्त असलं तरीही नंतर मात्र हे दर वाढत जातात. ज्यामुळं ही किंमत दीर्घ कालावधीसाठी पाहायची झाल्यास घर नव्यानं खरेदी करण्याच्या किमतीइतकीच होते.
खर खरेदी करताना फरक इतकाच असेल की इथं तुम्हाला अनामत रक्कम म्हणून एक मोठी रक्कम तयार ठेवावी लागेल. पण, इथं एक बाब म्हणजे ते घर मात्र तुमच्या नावावर होईल. भाडेतत्त्वावरील घराच्या बाबत सांगावं तर, ते घर तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि करारानुसार हवं तेव्हा सोडू शकता, जिथं तुम्हाला महिन्याला कर्जाचा हप्तासुद्धा भरावा लागणार नाही.