एकेकाळी श्रीदेवीला लेडी बच्चन म्हणायचे आता विद्या बालनला भविष्यात लेडी शाहरुख म्हणावं लागेल अशी चिन्हं आहेत. विद्या बालन हिंदी सिनेमाची नवा हिरो आहे. वाक्य वाचून धक्का बसला असेलच पण द डर्टी पिक्चरने तिकिटबारीवर अवघ्या पाच दिवसात ३९ कोटी रुपयांचा छनछनाट करुन दाखवला आहे. स्त्री केंद्रस्थानी असलेल्या कथानकावर हिंदी सिनेमा यशस्वी ठरु शकतो हे बॉलिवूडमध्ये अपवादानेच पाहायला मिळतं.
द डर्टी पिक्चरने बॉक्स ऑफिसवर केलेली कमाई रॉकस्टार आणि देसी बॉईजच्या तोडीस तोडी आहे. पण फरक इतकाच आहे की या दोन्ही सिनेमांचे बजेट डर्टी पिक्चरपेक्षा जास्त होतं आणि मोठ्या प्रमाणावर रिलीज करण्यात आले होते. द डर्टी पिक्चर या सिनेमाचा निर्मिती खर्च होता ३२ कोटी रुपये आणि १६०० स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आला होता. तर देसी बॉईज २२०० स्क्रिन्स आणि रॉकस्टार १८०० स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आले होते.
सिंगल स्क्रिन्स आणि मल्टीप्लेक्स या दोन्हीकडे सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं निर्माती एकता कपूरने म्हटलं आहे. आता सिल्क स्मिताच्या आयुष्यावर बेतलेला आणि विद्या बालनने साकारलेली बोल्ड भूमिका यामुळे प्रेक्षकांनी गर्दी केली नसती तर नवलच म्हणावं लागलं असतं.
यंदाच्या वर्षात स्त्रीया मुख्य भूमिकेत असलेल्या चार सिनेमे प्रदर्शित झाले. त्यापैकी दिल्लीतील जेसिका लाल हत्येवर आधारीत नो वन किल्ड जेसिकाने ३९ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. या सिनेमात कोणीही तगडा नायक नव्हता सारी भिस्त राणी मुखर्जी आणि विद्या बालन यांच्यावर होती. पण प्रेक्षकांनी सिनेमाला पसंती दिली. बॉलिवूडचे प्रेक्षक प्रगल्भ होत असल्याची ही खूण म्हणावी लागेल.
प्रकाश झाची निर्मिती असलेला टर्निंग ३० मध्ये शहरातील तरुण स्त्रीच्या प्रेमभंगाची आणि करिअरमधल्या उलथापालथीची कहाणी होती. गुल पनाग लीड रोलमध्ये असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन अलंक्रिता श्रीवास्तवने केलं होतं.
युटीव्हीची निर्मिती आणि प्रियंका चोप्राची प्रमुख भूमिका असलेला 7 खून माफ ही विशाल भारद्वाजचा सिनेमा एक धाडसी प्रयोगशील कलाकृती होतो. पण सिनेमा कुठेतरी फसला आणि प्रेक्षकांच्या मनाची पकड घेऊ शकला नाही. पण तरीही सात नवऱ्यांना यमसदनी धाडणाऱ्या स्त्री व्यक्तीरेखेवर हिंदी सिनेमा काढायला विलक्षण धाडस लागतं राव.
मधूर भांडारकरने आता पर्यंत चांदनी बार, फॅशन नागेश कुकनूरने डोर तसंच लज्जा, चमेली, आयशा, कॉरपोरेट सारखे स्त्री व्यक्तीरेखा मध्यवर्ती भूमिकेत असलेले सिनेमे प्रेक्षकांना निश्चितच एक वेगळा अनुभव देऊन गेले.