बालगंधर्वांनी अजरामर केलेलं संगीत मानापमान हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येतंय. शंभर वर्षांपूर्वी हे नाटक लिहिलं गेलं होतं. हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येण्यासाठी राहुल देशपांडेंनी पुढाकार घेतलाय. येत्या अठरा तारखेला संगीत मानापमानचा पहिला प्रयोग पुण्यात होणार आहे.
मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये १२ मार्च १९११ रोजी मानापमान नाटकाचा प्रथम प्रयोग ‘किलोस्कर संगीत मंडळींकडून’ सादर झाला. इतके वर्ष एखादे नाटक सादर होणे आणि त्याच्याविषयाची महती अजूनही टिकणे, या मागे नाटककाराची प्रतिमा आढळून येते. कथानकं मिळवून ती फुलवणं आणि त्यामध्ये समाजातील परिस्थितीचे प्रतिबिंब दाखविणे, असे वैशिष्टय़ आहे. म्हणून १०० वर्षांनंतरही ‘मानापमान’ सारखे नाटक ताजेतवाने वाटते. लोकमान्य तिळक यांना देखील हे नाटक आवडले होते.
परिस्थितीनं गरीब पण कर्तृत्वाने शूर असणारा नायक आणि स्वत:च्या ऐश्वर्याची घमेंड असणारी नायिका’ यामध्ये पहिल्याच प्रवेशात घडलेला संघर्ष यामधून ‘मानापमान’ सुरू होते व नाटकाच्या समाप्तीपर्यंत नायिकेसह प्रेक्षकास स्वर्तृत्व मोठे करण्यास प्रवृत्त करते. श्रीमंत कुळात वाढलेली ‘भामिनी’ ‘धनी मी पती वरीन कशी अधना’ असं म्हणत सेनापती असलेल्या पराक्रमी धैर्यधराशी लग्न करण्यास साफ नकार देते. या अपमानामुळे धैर्यधराच्या मनात भामिनीविषयी शेवटपर्यंत तिरस्कारच दाखवत, ‘स्वत:च्या पराक्रमानेच पत्नी मिळवून दाखविन’अशी ईर्शा यातून दिसून येते.
श्रीमंतीची लालसेची खिल्ली उडविण्यासाठी ‘लक्ष्मीघर’ या पात्राची फजिती या नाटकात सादर होते. तसेच धैयधराच्या मनातील भामिनी बद्दलचा राग लक्षात घेवून प्रत्यक्षात ‘भामिनी’च ‘वनमाला’ हे नाव धारण करते व धैर्यधरास जिंकते. इथे पराक्रमी नायकास कर्तबगार परंतु श्रीमंतीस दुय्यम स्थान देणारी नायिका भेटते.
आजही ताजंतवानं असलेल्या या नाटकातील पदेही खूप लोकप्रिय आहेत. अगदी ‘नमन नटवरा’ या नांदीपासून ‘धनी मी पती वरीन कशी अधना’, ‘या नवल नयनोत्सवा’ ‘टकमक पाही सूर्यरजनी मूख’, ‘चंद्रिका ही जणू’, ‘दे हाता शरणागता’, ‘नाही मी बोलत’, ‘शुरा मी वंदिले’, ‘प्रेमभावे जीव जगीया’, ‘प्रेम सेवा शरण’, ‘रवी मी’, ‘माता दिसली’, ‘युवती मना दारुण रण’, ‘मला मदन भासे’, अशी जवळजवळ पंचवीसहून अधिक गाणी मास्टर दीनानाथ मंगेशकर, आशा भोसले, डॉ. वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर, पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजात आजही लोकप्रियता टिकवून आहेत.