माझं नाव गेलं कुठं? प्रश्नातूनच आमदाराचं नाव गायब होतं तेव्हा...

विधानसभेत वातावरण कधी गंभीर तर कधी हलकं फुलकं असतं. काही आमदार आपले प्रश्न अत्यंत गंभीरपणे मांडत असतात. वातावरण गरम झालेलं असत अशावेळी एकदा दुसऱ्याला लहर येते आणि तो असं काही बोलून जातो की वातावरण चुटकीसरशी हलकं होतं.

Updated: Mar 7, 2022, 06:24 PM IST
माझं नाव गेलं कुठं? प्रश्नातूनच आमदाराचं नाव गायब होतं तेव्हा...  title=

मुंबई : आपल्या मतदारसंघात येणाऱ्या अडी अडचणी सोडविण्यासाठी विविध संसदीय आयुंधाचा वापर करून सरकारकडून त्या समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न आमदार करतात. त्यासाठी अधिवेशन म्हटलं की आमदारांच्या उत्साहाला उधाण येतं.

अनेकदा सभागृहात गंभीर विषयावर चर्चा होते. विरोधी पक्ष सरकारवर सडकून टीका करतात. गोंधळ होतो, काहींचे निलंबन होते. सभागृहाचं कामकाज तहकूब केलं जातं. कधी कधी हे वातावरण दोन तीन दिवस कायम असतं. वातावरणात गांभीर्य वाढलेलं असतं, अशावेळी कुणाला लहर येते, हास्यफवारा उडतो आणि ते वातावरण हलकं होतं.

गुरुवारपासून अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु झालंय. विरोधकांच्या गोंधळामुळे सतत चार दिवस कामकाज अर्ध्यावर उरकलं जातंय. मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून पहिले दोन दिवस विरोधक आक्रमक होते. तर, आज शेतकर्‍यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झालेत.

गुरुवार हा अधिवेशनाचा पहिला दिवस राज्यपालांचे अभिभाषण, त्यावरून झालेला गोंधळ, त्याचे सभागृहात उमटलेले पडसाद आणि कामकाज तहकूब असा संपला. दुसऱ्या दिवशीच्या कामकाजात लक्षवेधी सूचना दिली होती. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकी, संदीप क्षीरसागर आणि बाळासाहेब आसबे यांनी  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मात्र ही लक्षवेधी सूचना शुक्रवारी आणि शनिवारी या दोन्ही दिवशी पुढे ढकलण्यात आली. आज या लक्षवेधी सूचनेवर सभागृहात चर्चा उपस्थित होताच आमदार प्रकाश सोळंकी यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला.

अध्यक्ष, शुक्रवारी या प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी माझे नाव पहिल्या क्रमांकावर होते. दोन दिवस झाले आज या सभागृहात ही चर्चा उपस्थित होतेय आणि यात माझं नाव कुठं आहे? प्रश्न तोच आहे. त्यावर मंत्र्यांचं उत्तरही तेच आहे. पण, प्रश्न विचारणारी नाव मात्र दुसरीच दिसताहेत.

पहिल्या दिवशी तीन आमदारांनी उपस्थित केलेली लक्षवेधी सूचनेवर आता विरोधी पक्षाच्या सदस्यांची नावे पुढे आलीत. तर आमची नावे कुठे मागे गेलीत ते कळत नाही. आमच्या प्रश्नावरही आता विरोधक डल्ला मारू लागलेत कि काय अशी शंका येत असल्याचे प्रकाश सोळंकी यांनी सांगताच सभागृहात हास्यफवारा उडाला.