मुंबई: विधानसभा निवडणुकीत अनुच्छेद ३७० आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावरून प्रचार करण्याची काय गरज होती, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी बुधवारी 'एएनआय' वृत्तसंस्थेशी बोलताना यासंदर्भात भाष्य केले. यावेळी राऊत यांनी म्हटले की, विधानसभा निवडणुकीत पाकिस्तानच्या मुद्द्यावरून प्रचार करण्यात काय अर्थ आहे? पाकिस्तानविषयी केंद्र सरकारची भूमिका काय आहे, हे लोकांना आधीपासूनच ठाऊक आहे.
या मुद्द्यावरून जनतेने लोकसभा निवडणुकीत तुम्हाला मतदान केले. तसेच राम मंदिराचा प्रश्नही लोकसभेच्या प्रचारातील प्रमुख मुद्दा होता. तेव्हा याच मतदारांनी शिवसेना- भाजपला मते दिली. मात्र, विधानसभा निवडणुकीचे मुद्दे पूर्णपणे वेगळे असायला हवेत, असे राऊत यांनी सांगितले.
त्यामुळे आता विधानसभा निवडणूक संपल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपचा संपूर्ण प्रचार हा अनुच्छेद ३७० भोवत केंद्रित होता. अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक सभेत एकसंध भारताचा हवाला देत अनुच्छेद ३७० च्या यशाचा फायदा भाजपला कसा मिळेल, यासाठी पूरेपूर प्रयत्न केले होते. मात्र, विरोधकांनी विधानसभा निवडणुकीत अनुच्छेद ३७० मुद्द्याचे काय काम, असा सवाल केला होता. यावरून मोदींनी विरोधकांना अनुच्छेद ३७० पुन्हा लागू करून दाखवा, असे आव्हान दिले होते.
#WATCH: Shiv Sena leader Sanjay Raut on issues of #Article370 & Ram Mandir in Assembly Elections:What will you do by raising issue of Pakistan in State Assembly Elections?People know Centre's policy on Pak, they voted for us in LS polls on Ram Mandir.Issues of state are different pic.twitter.com/Hsfss3WUtZ
— ANI (@ANI) October 23, 2019
मात्र, आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही हाच राग आळवला आहे. त्यामुळे विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपमधील संबंध पुन्हा ताणले जाणार का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.