Western Railway 35 Day Mega Block: पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना पुढील 35 दिवस विलंबाने धावणाऱ्या लोकल आणि गोंधळ सहन करावा लागणार आहे. याचं कारण पश्चिम रेल्वेवर तब्बल 35 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. गोरेगाव आणि कांदिवलीदरम्यान सहावी मार्गिका टाकण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. महिन्याच्या शेवटी हा ब्लॉक सुरु होईल. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवादरम्यान 4.75 किमी लांबीच्या मार्गिकेचं काम केलं जाणार नाही. सध्या 27 आणि 28 ऑगस्टच्या रात्रीपासून हे काम सुरु करण्याचा तात्पुरता निर्णय घेण्यात आला आहे.
गतवर्षी नोव्हेंबरमध्ये सांताक्रूझ-गोरेगावदरम्यान सहाव्या मार्गिकेचं काम सुरु असताना 2500 हून अधिक लोकल रद्द झाल्या होत्या. अधिका-यांनी यावेळी पाच विकेंड्सदरम्यान सुमारे 700 लोकल सेवा प्रभावित होतील असं सांगितलं आहे.
पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही रात्री 10 तासांचा मोठा मेगाब्लॉक घेण्याचं ठरवलं आहे. मुख्यतः शनिवारी हे ब्लॉक घेतले जातील जेव्हा दररोज 130-140 लोकल रद्द होण्याची शक्यता आहे. वीकडेजला मात्र कमी लोकल रद्द होतील. कारण त्या रात्री 5 तासांचा ब्लॉक असेल. सध्या प्रवाशांना ज्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे, ती ही पायाभूत सुविधा सुधारित केल्यानंतर कमी होईल”.
रात्रीचा ब्लॉक रात्री 10-11 वाजता सुरू होणं अपेक्षित आहे. दिवस कोणता आहे यावरही ते अवलंबून असेल. सूत्रांच्या माहितीनुसार, 7 ते 17 सप्टेंबर दरम्यान ते 7 सप्टेंबर वगळता रात्री 10 ते सकाळी 8 या वेळेत ब्लॉक घेणार नाहीत.
संभाव्य वेळापत्रकानुसार, 10 तासांचे पाच मेगा ब्लॉक घेतले जाणार आहेत. 5व्या, 12व्या, 16व्या, 23व्या आणि 30व्या दिवशी (गणपती उत्सवातील दिवस वगळून) हे ब्लॉक घेतले जातील.
रेल्वे अभियंत्यांनी सांगितले कीस त्यांनी मालाड स्थानकाच्या पश्चिमेला एक नवीन रेल्वे लाईन आणि प्लॅटफॉर्म आधीच बांधला आहे आणि सहाव्या लाईनला सामावून घेण्यासाठी ते कट-आणि-कनेक्ट पद्धतीने ट्रॅक पूर्वेकडे हलवतील. सांताक्रूझ-बोरिवली मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी उपनगरीय ट्रॅक टाळण्याची (STA) लाईन नावाची पाचवी रेल्वे लाईन अस्तित्वात आहे.
योजनेनुसार, ही नवीन रेल्वे लाईन विरारकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी स्लो लाईनमध्ये रूपांतरित केली जाईल, सध्याची विरारकडे जाणारी स्लो लाईन नंतर चर्चगेटकडे जाणाऱ्या स्लो ट्रेनसाठी वापरली जाईल. चर्चगेटकडे जाणाऱ्या गाड्यांची सध्याची स्लो लाईन विरारकडे जाणाऱ्या जलद गाड्यांना दिली जाईल, विरारकडे जाणाऱ्या जलद मार्गाने वापरलेले ट्रॅक नंतर चर्चगेटला जाणाऱ्या जलद गाड्यांना पुरवतील, चर्चगेटला जाणारी फास्ट लाईन ही 5वी लाईन असेल आणि STA सहावी लाईन असेल.
हे काम गोरेगाव-कांदिवली मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी रेल्वे ट्रॅकचे विभाजन करेल. कांदिवली-बोरिवली कॉरिडॉरचे उर्वरित काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी सूत्रांची माहिती आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये, पश्चिम रेल्वेने सांताक्रूझ-गोरेगाव कॉरिडॉरवरील सहाव्या मार्गावरील प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला. बोरिवलीपर्यंत सहाव्या मार्गाचा विस्तार करण्याची गरज महत्त्वाची आहे कारण त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या उपनगरीय रेल्वेच्या जलद मार्गापासून दूर राहतील.