मुंबई : special megablock on Harbor railway line : मुंबई शहरात जोरदार पाऊस कोसळत आहे. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. दरम्यान, थोड्याच वेळात हार्बर लाईनवर दोन तासांचा तातडीचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. आज सकाळी मस्जिद स्टेशनजवळ एका खासगी भिंतीचा काही भाग ट्रॅकवर पडल्याने हा मेगाब्लॉक घेतला गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल सेवा वडाळा दरम्यान, काही वेळ बंद राहणार आहे.
मस्जिद स्टेशनजवळ एका खासगी भिंतीचा काही भाग रुळावर आल्याने मातीचा ढिगारा रेल्वे रुळावर आला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी भिंतीचा ढिगारा बाजुला केला आहे. यादरम्यान पंधरा मिनिटे वाहतूक बंद होती. सकाळी सव्वासात वाजता ही घटना घडली होती. मात्र पडलेल्या भिंतीचा भाग सुरक्षित करण्यासाठी काही वेळात दोन तासाचा अर्जंट ब्लॉक मस्जिद रेल्वे स्थानक येथे घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक दुपारी 2 ते सायंकाळी 4 वाजता घेण्यात येणार आहे. त्यामुळे पनवेल ते वडाळापर्यंत वाहतूक सुरु राहणार आहे.
यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा लोकल रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. या ब्लॉगदरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना दादर, कुर्ला येथून मेन लाईनने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.