पोलीस विभागाने गृहखात्याला सादर केला अहवाल, काय आहे यात ?

या अहवालात परमबीर सिंह यांच्यावर ठपका 

Updated: Apr 7, 2021, 10:28 AM IST
पोलीस विभागाने गृहखात्याला सादर केला अहवाल, काय आहे यात ? title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचे आरोप केले. त्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. सचिन वाझेला पाठीशी घालत असल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. दरम्यान पोलीस विभागाने गृहखात्याला एक अहवाल सुपूर्द केलाय. या अहवालात परमबीर सिंह यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय. 

सचिन वाझे यांची पुर्ननियुक्ती परमबीर सिंह यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत करण्यात आली. तत्कालीन पोलीस सह आयुक्त गुन्हे यांचा वाझेंच्या‌ नियुक्तीला विरोध असतानाही परमबीर सिंह यांनी त्यांची नियुक्ती केली. असा या अहवालात खुलासा करण्यात आलाय. 

वाझे सर्वसाधारण पोलीस निरीक्षक असतानाही ते थेट तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना रिपोर्ट करायचे.  विविध हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास परमवीर सिंग यांच्या सांगण्यानुसार वाझेंकडे‌ देण्यात आला होता. वाझेंच्या टीममधल्या व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांना रिपोर्टिंग करण्यास मनाई करण्यात आली होती असे यात म्हटलंय. 

हायप्रोफाईल प्रकरणात‌ मंत्र्यांच्या ब्रिफिंगवेळी परमबीर सिंह यांच्याबरोबर वाझेसुद्धा हजर राहायचे. सरकारी गाड्या उपलब्ध असताना वाझे मर्सिडिज, ऑडी या वाहनानं कार्यालयात यायचे. परमबीर सिंह आणि वाझे यांचं साटेलोटे असल्याचं पोलीस विभागाने गृह खात्याला सादर केलेल्या अहवालात दिसून येतंय. त्यामुळे आता यावर परमबीर सिंह यांच्या बाजुने काय नवा खुलासा होतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.