मुंबई : शिवसेनेने दगाफटका होऊ नये म्हणून आपल्या आमदारांना एका हॉटेलमध्ये ठेवले आहे. राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीला (Rajyasabha Election 2022) मोठं महत्त्व आलं आहे. एक एक आमदाराचं मत महत्त्वाचं ठरणार आहे. भाजप आणि महाविकासआघाडीला आपला खासदार निवडून आणण्यासाठी अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना सोबत घ्यावं लागणार आहे. त्यामुळे त्यांना ही विशेष महत्त्व आलं आहे.
शिवसेना आमदारांना (Shivsena MLA) ठेवलेल्या हॉटेल ट्रायडेंटमध्ये भाजप नेते आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) पोहोचले होते. एका भाजप पदाधिकाऱ्यासोबत लॉबीमध्ये सुमारे तासभर आशिष शेलार चर्चा करत बसले. आशिष शेलार अचानक ट्रायडेंटमध्ये आल्यानं शिवसेना आमदार आणि पदाधिकारी अलर्ट झाले. मात्र आशिष शेलार कुठल्याही शिवसेना आमदाराला भेटले नाहीत. आशिष शेलारांच्या अचानक प्रवेशामुळे सेनेच्या गोटात खळबळ पाहायला मिळाली.
10 जूनला राज्यसभेची निवडणूक होत आहे. राज्यात त्यामुळे राजकीय हालचालींना मोठा वेग आलाय. सर्वच पक्षांनी आपले आमदार फुटू नय म्हणून काळजी घेतली आहे. महाविकासआघाडीने यासाठी एक बैठक देखील काल घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. महाविकासआघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं आवाहन त्यांनी आमदारांना केलं.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपचे 3, राष्ट्रवादीचा 1, शिवसेनेचे 2 आणि काँग्रेसचा 1 असे एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सातव्या जागेसाठी चुरस असणार आहे.