Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत घोटाळा झाला आहे, हा गंभीर विषय आहे. निवडणूक जिंकण्यासाठी हा प्रकार होता, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केला. ही योजना भविष्यात राहिल की नाही याची शंका वाटते, असंही राऊतांनी म्हटलं. एकिकडे राऊत या योजनेसंदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधत असतानाच योजनेबाबत सत्य समोर आणण्यासाठी श्वेतपत्रिका काढून महाराष्ट्राला सरकारनं माहिती द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे.
विधानसभफा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना शासनानं धक्का देण्याची तयारी केल्याचं पाहायला मिळालं. योजनेच्या लाभार्थी होण्यासाठी अनेक बहिणींनी निकषांचं उल्लंघन करत अर्ज भरले खरे. पण, हे अर्ज बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली. थोडक्यात काही महिलांना आता या योजनेचे पैसे मिळणं बंद होणार असल्याची बाब अधोरेखित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केलं.
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना लाडकी बहीण योजनेविषयीचा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, 'ही योजना लाडक्या बहिणी आणि सरकारमधील विषय आहे. आम्ही लाडक्या बहिणींमुळे जिंकलो असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे आता बहिणींना पैसे देणार नसाल तर, त्यांची मतं परत द्या. हा गंभार विषय आहे, इथं मोठा घोटाळा झाला आहे.'
यावेळी बीडमधील तणावाच्या परिस्थितीवर राऊतांनी भाष्य केलं. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. सुरेश धस देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाशिवाय बोलणार नाहीत असा दावा राऊतांनी केला. पोलिसांच्या तपासात बाधा येईल असं आता काही दिवस करु नये असं आवाहनही त्यांनी केलं.