मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांचं लक्ष हे शिवसेना वाढवण्यावर नाही, तर उद्धव ठाकरे ज्या खुर्चीत बसले आहे, त्या खुर्चीवर आहे. राऊत यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली आहे, असे गंभीर आरोप नारायण राणे यांनी केले आहेत. यावर खासदार विनायक राऊत यांनी मुंबईतल्या शिवालय इथे पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांचे आरोप खोडून काढले.
संजय राऊत यांनी राष्ट्रवादीकडून शिवसेना संपवण्याची सूपारी घेतल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला आहे. यावर आता संजय राऊत यांनी अवघ्या दोन शब्दात नारायण राणे यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत
होय मी प्रखर राष्ट्रवादी आणि राष्ट्रभक्त आहे, आमचा कुठेही डोळा नाही, आमचा फक्त शिवसेनेच्या विस्तारावर डोळा आहे महाराष्ट्रात आणि देशामध्ये. २०२४ पर्यंत शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहचलेली असेल. आणि बरेचसे लोकं तोपर्यंत बेरोजगार झालेले असतील, अशा शब्दात संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.
नारायण राणे यांचे संजय राऊत यांच्यावर आरोप
संजय राऊत यांचं लक्ष शिवसेना वाढवण्यासाठी नाहीए, तर संजय राऊतचं लक्ष उद्धव ठाकरे जिथे बसले आहेत ना त्या खुर्चीवर आहे. हा शिवसेनेचा नाही, तर राष्ट्रवादीचा आहे. त्याला सुपारी मिळाली आहे, अशा शब्दात राणेंनी राऊतांवर जोरदार प्रहार केला.
"तू पत्रकार नाहीस आणि संपादकही नाहीस तुझी भाषा त्या पात्रतेची नाही. बेताल आरोप करतोस तू, पण काल अस्वस्थ अशी का झाली. का बेजाबदार बोलत होता, घामाघूम झाला, थैयथैयाट होता, कशामुळे, प्रविण राऊतने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर थैयथैयाट झाला", अशा शब्दात राणेंनी राऊत यांच्या पत्रकारितेची लक्तरं काढली. संजय राऊत यांचे प्रवीण राऊतशी काय संबंध आहेत, किती व्यवहार झालेत, अजून बरंच बाहेर यायचं आहे. त्यामुळे दुसऱ्यांवर आरोप तुझं काम नाहीए, पगारी नेता आहेस तू. सामनातून पगार घेतोस, त्यावर अधिक कमवतोस असे आरोपही नारायण राणे यांनी केले आहेत.