मुंबई : शिवतीर्थ म्हणजेच मुंबईतील शिवाजी पार्क येथे गुरुवारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झालं. ज्या धर्तीवर महाविकासआघाडाच्या नेतेपदी असणाऱ्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
अतिशय दिमाखदार अशा या सोहळ्याच्या वेळी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील बऱ्याच मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली. नेतेमंडळी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या गर्दीत ठाकरे कुटुंबातील मंडळींनीही सर्वांचं लक्ष वेधलं. व्यासपीठावर मंचकाशेजारीच बसलेले राज ठाकरे यावेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. शपथविधीसोहळ्याच्या सुरुवातीपासून अगदी अखेरपर्यंत बरेच क्षण पाहण्याजोगे होते.
'छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन...', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली. ज्यानंतर व्यासपीठावर येत त्यांना अनेकांनीच शुभेच्छा दिल्या. यामध्ये राज ठाकरे यांच्या मातोश्रींचाही सहभाग होता. शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी होत असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुंदा ठाकरे यांना येण्यास वाट देत त्यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतला. अवघ्या काही क्षणांच्या त्या भेटीमध्ये राज ठाकरे यांच्या मातोश्री भावूक झाल्याचं त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. तर, खुद्द उद्धव ठाकरे यांच्याही भावना त्यावेळी चेहऱ्यावर दिसत होत्या.
कुटुंबाला उद्धव ठाकरे यांचा असणारा सार्थ अभिमान आणि त्याचीच प्रचिती देणारे हे क्षण पाहताना उभ्या महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. याच क्षणांमध्ये 'चार चाँद' लावून गेले ते म्हमजे या सोहळ्याला उपस्थिती लावणारे खास पाहुणे. प्रादेशिक पातळीवर काम करणाऱ्या आणि एकजुटीने भाजपविरोधी भूमिका असणाऱ्या पक्षांची व्यासपीठावरील एकजुट पाहून याविषयीच्या बऱ्याच प्रतिक्रियाही उमटू लागल्या होत्या.
पवार कुटुंबात फूट पडू नये यासाठी 'दोन' व्यक्तींची महत्त्वाची भूमिका
शपथविधी सोहळा पार पडला, मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी आता उद्धव ठाकरे सज्जही झाले आहेत. तेव्हा आता ते या पदाचा कार्यभार सांभाळताच राज्याच्या राजकारणात ते कोणते बदल घडवून आणतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.