'युतीचा तिढा सोडवायचा असेल तर एकाला त्याग करावा लागेल'

कालपासून राजकीय वर्तुळात शिवसेना नरमल्याची चर्चा होती.

Updated: Oct 31, 2019, 11:26 AM IST
'युतीचा तिढा सोडवायचा असेल तर एकाला त्याग करावा लागेल' title=

मुंबई: युतीमधील तिढा सोडवायचा असेल तर शिवसेना आणि भाजप यांच्यापैकी एकाला त्याग करावा लागेल, असे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी व्यक्त केले. यापूर्वी दोन्ही पक्षांमध्ये संवाद ठेवण्याचे काम माझ्याकडे होते. मात्र, आता ती जबाबदारी माझ्याकडे नाही. उद्धव ठाकरे यांनी मला सांगितले तर मी एका झटक्यात हा प्रश्न सोडवेन. राजकारण डोक्यात ठेवून हा प्रश्न सुटणारा नाही. त्यासाठी एकाला त्याग करणे गरजेजे आहे. शिवसेनेने तो त्याग केला तर काही अडचण येणार नाही, असे मनोहर जोशी यांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

शिवसेना नरमली ही केवळ अफवा- संजय राऊत

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सहा दिवस उलटल्यानंतरही सत्तास्थापनेचा तिढा अजून सुटलेला नाही. भाजपला अपेक्षित जागा न मिळाल्यामुळे सत्तास्थापनेत शिवसेनेला महत्त्व प्राप्त झाले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युलाच्या अंमलबजावणीसाठी आग्रह धरला आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपकडून सेनेला तसे कोणतेही वचन देण्यात आले नसल्याचे सांगत ही मागणी धुडकावून लावली आहे. त्यामुळे सध्या दोन्ही पक्षांमध्ये धुसफुस सुरु आहे.  

गरज सरो आणि वैद्य मरो; शिवसेनेचा भाजपला टोला

दरम्यान, कालपासून राजकीय वर्तुळात शिवसेना नरमल्याची चर्चा होती. मात्र, संजय राऊत यांनी गुरुवारी हे सर्व दावे फेटाळून लावली. शिवसेना नरमली ही निव्वळ अफवा आहे. ठरलेली भूमिका भाजपने बदलली. ठरल्याप्रमाणे चर्चा व्हायला हवी. आमचं पाऊल मागे जाणार नाही. हक्काचं आहे ते मिळालंच पाहिजे. आमची नव्हे तर भाजपची भूमिका ताठर आहे, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपला झापले आहे.