मुंबई | कॅन्सर तिला दुबळा करू पाहतोय, मात्र ती आहे कलेच्या देवतेची निस्सीम भक्त... आणि म्हणूनच की काय कॅन्सरशी लढता लढता तिच्या हातून घडताहेत मनमोहक गणेशमूर्ती..
मुलुंडच्या म्हाडा कॉलनीत असलेल्या गीतांजली कांबळी यांच्या कार्यशाळेतील लगबग वाढली आहे. गीतांजली सध्या या गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवत आहेत. सही रे सही, कुंकू या नाटक आणि मालिकांमधून अभिनय साकारणाऱ्या गीतांजली कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशीही लढत आहेत. रंगभूमीवरून काही काळासाठी एक्झिट घेऊन एकीकडे आजाराशी सामना तर दुसरीकडे गणेशांच्या सुबक मूर्ती त्या घडवत आहेत.
किमोथेरपीसारख्या वेदनादायी उपाचारांतून जाण्यासाठी गणेश मूर्ती घडवण्याची कलाच बळ देत राहिली असं गीतांजली सांगतात. कलेप्रती प्रेम आणि बाप्पावरील श्रद्धेमुळे त्यांनी त्यांच्यावरील एक शस्त्रक्रिया पुढे ढकलली आहे. त्यांच्या जिद्दीचं त्यांचे पती लवराज कांबळीही कौतुक करतात.
गणपती ही कला आणि विद्येची देवता मानली जाते. आणि कलाच गीतांजली यांना त्यांच्या दुर्धर आजाराशी लढण्याचे बळ देते. जगण्याची ऊर्जा देते.