Mumbai Local : गेल्या काही महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलमध्ये विनातिकीट तपासणी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात येत आहे. लोकलच्या तिन्ही मार्गावर करण्यात आलेल्या कारवाईत लाखो रुपयांचा दंड रेल्वे प्रशासनाने वसूल केला आहे. मात्र आता काही प्रवासी बनावट पास तयार करुन मुंबई लोकलमधून प्रवास करत असल्याचेही समोर आलं आहे. अशाच एका महिला प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहे. त्यामुळे आता टीसींनी देखील मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु केली आहे. अशातच एसी लोकलमधून थेट बनावट पासचा वापर करुन प्रवास करणाऱ्या एका महिलेला पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासनीसांनी पकडलं आहे. या महिलेविरोधात रेल्वे प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसी लोकल ट्रेनचा बोगस पास वापरल्याबद्दल महिला प्रवाशाला पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासकांनी बुधवारी पकडले. हरप्रीत कौर आणि जसविंदर कौर या मुंबई सेंट्रल विभागात उपमुख्य तिकीट निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तिकीट तपासनीकांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमधून धक्कादायक माहिती समोर आली. ट्रेनमध्ये नियमित तपासणी दरम्यान फ्लाइंग स्क्वाडच्या या तिकीट तपासणी पथकाला प्लास्टिकने झाकलेल्या पासमध्ये काहीतरी गडबड असल्याचे आढळले होते. बारकाईने तपासणी व अधिक तपासणी केल्यावर तो बनावट असल्याचे आढळून आले आणि या महिला प्रवाशाला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
विरार-चर्चगेट एसी लोकल ट्रेनमध्ये हा सगळा प्रकार उघडकीस आला. आरोपी महिलेकडे कर्मचार्यांनी तिकीट मागितले असता तिने पास दाखवला, ज्याची मुदत 28 डिसेंबर रोजी संपली होती. महिलेचा पास बनावट असल्याचे कळताच कर्मचाऱ्यांनी आणखी तपास केला तर आरोपीकडे आणखी एक बनावट पास सापडला.
सुरुवातीला या महिलेने रेल्वे बुकिंग बोर्डाजवळील एका दुकानातून पास मिळवल्याचा दावा केला होता. महिलेने सांगितले की दुकानदाराने तिला 29 डिसेंबर 2022 ते 28 जानेवारी 2023 पर्यंतच्या मासिक पाससाठी 1,880 रुपये आणि 29 सप्टेंबर 2023 ते 28 डिसेंबर 2023 पर्यंतच्या दुसर्या तिमाही पाससाठी 2,548 रुपये घेतले होते. मात्र आरोपी महिलेच्या आरोपीच्या संशयास्पद स्पष्टीकरणामुळे कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यानंतर तिकीट निरीक्षकांच्या तक्रारीनुसार महिलेविरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे चर्चगेट ते विरार एसी मासिक पाससाठी 2,205 रुपये आणि त्रैमासिक पाससाठी 5,985 रुपये मोजावे लागतात. मात्र या आरोपी महिलेने अर्ध्या किमतीत अंधेरीतील एका तिकीटाच्या दुकानातून पास तयार केल्याचे सांगितले होते. मात्र बनावट पास खरेदी केलेल्या दुकानाबाबतही आरोपी संशयास्पद उत्तरे देत आहेत. त्यामुळे आता आरोपी महिलेने स्वतःच्या घरीच पास तयार केल्याचा संशय रेल्वे पोलिसांना आहे.