आज मेगाब्लॉक! घराबाहेर पडण्याआधीच पाहून घ्या Mumbai Local च्या वेळापत्रकातील 'हे' मोठे बदल

Mumbai News : सणासुदीच्या दिवसांना नातेवाईकांच्या घरी ये- जा करणारी अनेक मंडळी तुम्ही पाहिली असतील. किंबहुना तुम्हीही त्यातलेच एक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी.   

सायली पाटील | Updated: Nov 14, 2023, 07:01 AM IST
आज मेगाब्लॉक! घराबाहेर पडण्याआधीच पाहून घ्या Mumbai Local च्या वेळापत्रकातील 'हे' मोठे बदल  title=
Mumbai Local Central Railway to follow sunday time table passangers have to face problem

Mumbai Local News : सध्या दिवाळीच्या निमित्तानं अनेक कार्यालयांना सुट्टी असली तरीही काही खासगी कार्यालयं मात्र त्यासाठी अपवाद ठरत आहेत. अशाच कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या आणि काही कामानिमित्त रेल्वे प्रवासासाठी निघालेल्या प्रवाशांचे मंगळवारीसुद्धा हाल होण्याची चिन्हं आहेत. कारण, मंगळवारीही मध्य रेल्वे मार्गावर रविवारच्याच वेळापत्रकानुसार लोकल धावणार आहेत. त्यामुळं कामासाठी असो किंवा मग एखाद्या ठिकाणी फिरण्यासाठी असो, काही कारणानं तुम्ही मध्य रेल्वेनं प्रवास करणार असाल तर खोळंबा होऊ शकतो. 

रेल्वेसेवेत हे बदल कशासाठी? 

दिवाळी सुरु झालेली असतानाच सोमवारी मात्र कोणतंही खास निमित्त अथवा दिवस नसतानाही मध्य रेल्वेकडून मुख्य आणि हार्बर मार्गावरील तब्बल 350 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. ज्यामुळं नेहमीप्रमाणं प्रवासासाठी घरातून निघालेल्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मंगळवारीसुद्धा असंच चित्र पाहायला मिळणार असल्यामुळं प्रवासाचं आणि वेळेचं नियोजन करूनच घरातून निघणं उत्तम पर्याय असेल हेच खरं. 

मंगळवारी दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदा असल्यामुळं काही कार्यालयांना सुट्ट्या आहेत. शिवाय शाळा- महाविद्यालयांनीही दिवाळीची सुट्टी सुरु असल्यामुळं अनेक मंडळी नातेवाईकांच्या घरी किंवा शहरातील इतर ठिकाणी फिरण्यासाठी निघतात. वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी ही मंडळी रेल्वे मार्गाला प्राधान्य देतात. पण, मंगळवारी मात्र परिस्थिती काहीशी मनस्ताप देणारी असू शकते, कारण मध्य रेल्वेवरील सर्व रेल्वे गाड्या रविवारच्या वेळापत्रकानुसारच धावणार असल्याचं अधिकृतपणे जाहीक करण्यात आलं आहे. 

हेसुद्धा वाचा : लठ्ठ मुंबईकर! 46 टक्के मुंबईकरांचं वजन सरासरीपेक्षा अधिक, वाचा मुंबई पालिकेचा अहवाल काय सांगतो

रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला नव्हता. पण,  लोकल मात्र रविवारच्याच वेळापत्रकानुसार धावल्या. ज्यानंतर सोमवार आणि आता मंगळवारीसुद्धा हेच वेळापत्रक निश्चित करत त्यानुसार रेल्वे धावणार असल्याचं सांगण्यात आलं ज्यामुळं मोठ्या संख्येनं घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचे हाल झाले. कार्यालयांना सुट्टी असणाऱ्या प्रवाशांना वगळता रेल्वेची गर्दी कमी झालेली नाही. उलटपक्षी रेल्वेच्या फेऱ्या रद्द केल्यामुळं त्याचा अतिरिक्त भार इतर लोकलवर येत असल्यामुळं ही एक नवी समस्या डोकं वर काढ आहे. ज्यामुळं नियमित वेळापत्रकानुसार रेल्वे सुरु कराव्यात अशीच मागणी प्रवासी सातत्यानं करताना दिसत आहेत. 

तुम्हीही दिवाळीच्या निमित्त सुट्टी असतानाही रेल्वे प्रवास करण्याच्या विचाराता असाल, किंवा दिवाळी असूनही नोकरीला जाणं भाग आहे म्हणून घराबाहेर पडणार असाल तर आधी रेल्वेचं बदललेलं वेळापत्रक पाहूनच घ्या.