Shiv Sena MLA Disqualifiation Result: ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा, राजकीय वातावरण तापलं... थोड्याच वेळात निकाल

Shiv Sena MLA Disqualification Hearing News: शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाला आता काही वेळच उरला आहे.  बेंचमार्क ठरणारा निर्णय असल्याची प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलीय. निकाल वाचनाचं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. 

राजीव कासले | Updated: Jan 10, 2024, 03:48 PM IST
Shiv Sena MLA Disqualifiation Result: ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा,  राजकीय वातावरण तापलं... थोड्याच वेळात निकाल title=

Shiv Sena MLA Disqualification Hearing : राज्याच्या राजकारणात आजचा दिवस सर्वात महत्त्वाचा आणि नाट्यमय ठरणार आहे. राज्याच्या सत्तानाट्याचा निवाडा आज होणार आहे. राज्यात उलथापालथ घडवणाऱ्या सत्तासंघर्षावर आज फैसला होणार आहे.. शिवसेना आमदार अपात्रतेता निकाल आज लागणार आहे.. शिवसेनेच्या शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार अपात्र ठरणार की ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार अपात्र ठरणार याचा फैसला अवघ्या काही तासांमध्ये लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे आज ऐतिहासिक निकाल देणार आहेत. संध्याकाळी चार वाजता शिवसेना आमदार अपात्रता निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष करणार आहेत. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष निकालाचे वाचन करतील. 500 पानांच्या निकालपत्रातून महत्त्वाचे मुद्दे घेत ते निकाल वाचतील. निकालाची मुळ प्रत दोन्ही गटाच्या वकिलांना नंतर दिली जाईल.

राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया
आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय देणारेत.निकालापूर्वी माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकरांनी प्रतिक्रिया दिली. निकालात कुठल्याही त्रुटी राहणार नाहीत, असं त्यांनी म्हटलंय. संविधानात ज्या लिखित तरतूदी आहेत, त्या सर्व तरतूदींना अनुसरुनच निर्णय असेल, तसंच निर्णय देताना कायद्याचं पालन होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

राजकीय घडमोडींना वेग
आमदार अपात्रता निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या सर्व आमदारांना बाळासाहेब भवनात बोलावण्यात आलंय. बाळासाहेब भवन इथं एकत्र जमून सर्व आमदार विधानभवनात जाणार आहेत.
बाळासाहेब भवनात निकालानंतर काय करायचं यावर चर्चा होणार आहे. दरम्यान, निकालासाठी दोन्ही गटाच्या वकिलांनी उपस्थित रहावे यासाठी विधिमंडळाकडून वकिलांना ईमेल पाठवण्यात आलेत. त्यामुळे आजच्या  सुनावणीला ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे हे उपस्थीत राहणार आहेत. तर देवदत्त कामत आजच्या आमदार अपात्रता निर्णयावेळी उपस्थित राहणार नाहीत. त्यांचे इतर सहकारी वकिल मात्र उपस्थित राहणार आहेत..

राजकीय भूकंप होणार?
राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होईल असा मोठा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. शिवसेना आमदार अपात्रता निकालावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केलाय.  तसंच पक्षांतर कायदा बदलण्याची मागणीही चव्हाणांनी केलीय..

आजचा निकाल लोकशाहीसाठी मार्गदर्शक ठरेल मात्र हा निकाल अंतिम निकाल म्हणता येणार नाही अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ विधिज्ञ अँड उज्जवल निकम यांनी दिलीय. ज्यांचं या निकालाने समाधान होणार नाही त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाता येईल असंही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाची निरीक्षणं, जनतेची भावना आणि समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे विधानसभा अध्यक्षांना निकाल द्यायचा आहे असंही निकम यांनी स्पष्ट केलं

दोन आमदारांची आमदारकी कायम राहाणार
आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके यांच्यावर अपात्रता निकालाचा कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आदित्य नातू असल्याने त्यांच्यावर अपात्रता कारवाई करणार नसल्याचं स्पष्ट केलं . तर आमदार ऋतुजा लटके मशाल  चिन्हावर निवडून आल्यामुळे  आमदार अपात्रतेच्या कारवाईपासून दूर असणारेत.