Maharashtra Police : राज्यातील पोलीस दलाच्या सेवेत असणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना दिवसरात्र एक करून कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का लागणार नाही, याची दखल घेत सेवा द्यावी लागते. राज्यात शांतता आणि कायद्याचं वातावरण राहावं यासाठी ही यंत्रणा अविरतपणे कार्य करत नागरिकांच्या हिताची काळजी घेत असते. याच पोलिसांमुळं गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप बसतो. अशा अनेक पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी नुकतीच समोर आली आहे, कारण लवकरच राज्यातील सहायक पोलीस निरीक्षपदी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती होणार आहे.
गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालय यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळं मागील दोन ते अडीच वर्षांपासून पदोन्नतीस पात्र असूनही अनेक पोलीस अधिकारी या बढतीपासून दूर होते. अखेर या कर्मचाऱ्यांनी न्यायालयाची मदत घेतली आणि त्यांच्या या लढ्याला यश मिळाल्याचं वृत्त एका प्रतिष्ठीत वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलं.
उपलब्ध माहितीनुसार राज्य पोलीस दलाच्या तुकडी क्रमांक 103 मधील जवळपास 440 सहायक पोलीस निरीक्षकांना या पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे. साधारण अडीच वर्षांपासून या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बढतीचा मुद्दा प्रलंबित राहिला होता, ज्याचा थेट फटका 600 पोलीस कर्मचाऱ्यांना बकसा होता. पण, अखेर मंगळवारी बढतीसाठी पात्र असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.
निरीक्षकपदी असणाऱ्या रिक्त जागांची संख्या पाहता या पदोन्नती प्रक्रियेला वेग मिळणार असल्याचं चित्र आता स्पष्ट होत आहे. पुढील 15 दिवसांमध्ये या पदोन्नतीसंदर्भातील अंतिम यादी तयार केली जाणार असून, मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये अधिकृत बढती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.