'राज ठाकरेंनी भेट नाकारली, विषय संपला; मी निवडणूक लढवणारच!'- सदा सरवणकर

Sada sarvankar On Raj Thackeray:  तुम्हाला उभं राहायचंय तर उभ राहा. मला कोणाशीच बोलायचं नाही, असे राज ठाकरे म्हणाले. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 4, 2024, 03:18 PM IST
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, विषय संपला; मी निवडणूक लढवणारच!'- सदा सरवणकर title=
सदा सरवणकर

Sada sarvankar On Raj Thackeray: माहीम मतदारसंघात सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांच्यात सामना रंगणार हे जवळपास निश्चित झालंय.. कारण काहीही झालं तरीही निवडणूक लढणार असल्याचं पुन्हा एकदा सरवणकर यांनी स्पष्टच सांगितलंय.. कुणीही सांगितलं तरीही आता माघार घेणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय. या सर्व पार्श्वभूमीवर सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी शिवसेच्या पदाधिकाऱ्यांसह राज ठाकरे यांची भेट घेतली. पण यातून काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे आपण निवडणूक लढवणार असल्याचे सदा सरवणकर म्हणाले आहेत. 

राज ठाकरेंच्या भेटीत काय झालं?

माझा मुलगा समाधान सरवणकर आणि महत्वाचे 4 पदाधिकारी राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. माझे वडील तुमच्याशी बोलू इच्छितात असे त्यांना सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला तुमच्याशी चर्चा करायला सांगितलंय, असे समाधान सरवणकर यांनी सांगितले. पण मला काही बोलायचं नाही. असे राज ठाकरे त्यांना म्हणाले. त्यांनी भेटसुद्धा नाकारल्याची माहिती सदा सरवरणकर यांनी दिली. 

मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. काही समीकरणं त्यांना समजवावीत असं मला वाटलं होतं पण त्यांनी भेट नाकारली. तुम्हाला उभं राहायचंय तर उभ राहा. मला कोणाशीच बोलायचं नाही, असे राज ठाकरे म्हणाले. पुढे काय करायचं हे मतदार ठरवतील. राज ठाकरे काय बोलले असते तर त्यांच्या शब्दाचा मान ठेवला असता. राज ठाकरे हे वरिष्ठ नेते आहेत. पण त्यांनी भेटच नाकारल्याचे सरवणकर म्हणाले. 

सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर आम्ही अमित ठाकरेंचाच प्रचार करणार, असे विधान भाजप नेत्यांनी केले होते. यावर सदा सरवणकर यांनी भाष्य केले आहे. 'मी महायुतीचा उमेदवार आहे. त्यामुळे महायुतीचे सर्व नेते मला पाठींबा देतील', असा विश्वास सदा सरवणकर यांनी व्यक्त केला.