Maharashtra Assembly Election : कोल्हापूर उत्तर (Kolhapur North) मतदारसंघामध्ये मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि एकच गोंळधाची परिस्थिती पाहायला मिळाली. सतेज पाटील यांच्या संतापानं परिसीमा गाठली, ज्यावर आता राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपचे कोल्हापूरमधील खासदार धनंजय महाडिक यांनी या राजकीय परिस्थितीवर आपलं मत मांडत सतेज पाटील यांच्या दुष्ट आणि घमेंडी स्वभावामुळे काँग्रेसला उतरती कळा लागली आहे असं जळजळीत वक्तव्य केलं.
बदलाची नामुष्की सतेज पाटलांवर
सुरुवातीला राजेश लाटकर यांना उमेदवारी घोषित केली असं सांगत काँग्रेस कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी त्याला विरोध केल्यामुळे उमेदवारी बदलाची नामुष्की सतेज पाटलांवर आली. राजकारणासाठी या व्यक्तीने राजघराण्याचा कशा पद्धतीने वापर केला हे दिसतंयच असं ते म्हणाले.
'मधुरिमाराजे छत्रपती यांचं उमेदवारी जाहीर झालेला पत्र दुसऱ्या दिवशी आलं आणि वाजत गाजत उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात पहिली पसंती त्यांची राजू लाटकर होती आणि दुसरी पसंती मधुरिमाराजे छत्रपती', असं सांगताना घडला प्रकार म्हणजे छत्रपती घराण्याचा अवमान आहे अशी प्रतिक्रिया महाडिक यांनी दिली.
शाहू महाराज, मधुरिमा राजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती यांनी उमेदवारी मागे घेतली हे असं काही काँग्रेसच्या संपूर्ण इतिहासात पहिल्यांदाच झालं असेल, असं सांगताना 'उमेदवारी मागे घेऊन कार्यालयातून बाहेर येत असतानाचे व्हिडिओ मन हेलावून टाकणारे होते.
सहा महिन्यापूर्वी गादीचा मान गादीचा मान म्हणून सगळीकडे मत मागत होते ते आज महाराजांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अर्वाच्या भाषेत बोलत होते. सतेज पाटील एवढे मोठे झाले आहेत का? ते थेट राजघराण्यावर बोलू लागले आहेत? स्वतःच्या सत्तेसाठी छत्रपती घराण्याचा वापर करायचा आणि त्यांना असं अर्वाच्य भाषेमध्ये बोलायचं...' असा सवाल धनंजय महाडिक यांनी केला. घडला प्रकार सर्व कोल्हापूरकरांनी पाहिला आहे ते हे सहन करणार नाहीत असा इशारा त्यांनी पाटील यांना दिला.
'आज उत्तर मध्ये झालेल्या एपिसोडचे परिणाम कोल्हापूर दक्षिण करवीर, शिरोळ, हातकणंगले या ठिकाणी असणाऱ्या पाचही उमेदवारांच सुफडा साफ होणार आहे. यामुळे कोल्हापुरात दहा विरुद्ध शून्य असा सामना होईल.. कोल्हापूरकरांमध्ये सतेज पाटील यांच्या विरोधात काँग्रेस पक्षामध्ये नाराजी निर्माण झाली आहे, मुळात काँग्रेसला आता उतरती कळा लागली आहे. सतेज पाटील याच्या स्वभावदोषामुळे परिस्थिती आली आहे. मी म्हणेल तोच कायदा या कोल्हापूरचा मालक आहे काँग्रेसचे सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते माझे नोकर आहेत. हा त्यांचा अविर्भाव होता त्याचा बुराखा पाडण्याचं काम काँग्रेसने केलं आहे', असं म्हणत महाडिक यांनी झाल्या राजकीय परिस्थितीवरून सतेज पाटलांना सुनावलं.