Maharashtra Election: प्रचार, मतदानाआधीच फडणवीसांना मुंबईत मोठं यश; BJP चा मार्ग सुखकर

Maharashtra Assembly Election 2024: उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अवघ्या शेवटच्या काही तासांमध्ये भाजपाला धक्का देणारा एक निर्णय त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने घेतल्याने पक्षाला इथे धक्का बसेल असं मानलं जात होतं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 4, 2024, 12:49 PM IST
Maharashtra Election: प्रचार, मतदानाआधीच फडणवीसांना मुंबईत मोठं यश; BJP चा मार्ग सुखकर title=
देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईला यश (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - फडणवीसांच्या ट्वीटर हॅण्डलवरुन साभार)

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंतचा वेळ असून अनेक बंडखोरांची समजून घालण्याचे प्रयत्न राजकीय पक्षांकडून केले जात आहेत. महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागत असून बंडखोरींची समजूत घालण्याचे प्रयत्न अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुरु असतील असं चित्र दिसत आहे. मात्र पक्षश्रेष्ठींचा आदेश मानणारा पक्ष अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्येही थेट मुंबईत मोठी बंडखोरी झाल्यानंतर ती शांत करण्यात राज्यातील पक्षाचे सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आहे. त्यामुळे बोरीवलीमधील निवडणूक भाजपासाठी स्वपक्षीयांचा विरोध न होता होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

भाजपाला बसला असता फटका

बोरिवलीतून भाजपाने तिकीट नाकारलेले माजी खासदार गोपाळ शेट्टींनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. अपेक्षा असूनही उमेदवारी अर्ज नाकारल्याने बोरिवलीतून गोपाळ शेट्टींनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. पक्षाने मुंबई उपाध्यक्ष संजय उपाध्याय यांना बोरीवलीमधून उमेदवारी दिल्याने शेट्टी नाराज झाले होते. आयात उमेदवारांना संधी दिली जाते असा शेट्टी यांचा आक्षेप होता. संजय उपाध्याय यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक नेते नाराज होते. नाराज स्थानिक नेत्यांमध्ये गोपाळ शेट्टींबरोबरच शिवानंद शेट्टी, गणेश खणकर, प्रविण दरेकर यांच्या कार्यकर्त्यांचाही समावेश होता. यापूर्वीही या मतदारसंघातून विनोद तावडे, सुनिल राणे हे उमेदवार देण्यात आल्याने स्थानिकांना डावललं जात असल्याची भावना येथील नेत्यांमध्यो होती.

आयात उमेदवारांच्या मुद्द्याला कंटाळून स्थानिकांनी पक्षाविरुद्ध बंड पुकारलं होतं. रस्त्यावर उतरून गोपाळ शेट्टी समर्थकांनी आपली नाराजीही व्यक्त केल्याचं या मतदारसंघात पाहायला मिळालं होतं. मात्र 29 तारखेला उमेदवारी भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आठवडाभराने बंडखोरी शमवण्यात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना यश आलं आहे. मुंबईच्या दृष्टीने हे फडणवीसांचं निवडणुकीपूर्वीचं मोठं यश मानलं जात आहे. बोरिवली हा भाजपासाठी महत्वाचा मतदारसंघ राहिला आहे.

नक्की वाचा >> बिनशर्त परतफेडीचा फॉर्म्युला ठरला? सरवणकरांचे माघार घेण्याचे संकेत; त्या मोबदल्यात मनसे...

फडणवीसांच यश, म्हणाले कधीच भाजपा सोडणार नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईचं हे यश असल्याचं सांगितलं जात आहे. गोपाळ शेट्टींनी स्वत: माघार घेत असल्याचं जाहीर करताना, "मी माघार घेत असून माझा मुद्दा वरपर्यंत अगदी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचलेला आहे," असं म्हणाले. यापूर्वी अर्ज भरला त्या रात्री भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शेट्टींची भेट घेतली होती. मात्र त्यांनी त्यावेळेस माघार घेण्यास नकार दिलेला. शेट्टी इथून उभे राहिले असते तर भाजपाचे उमेदवार संजय उपाध्याय यांना मोठा फटका बसला असता, असं मानलं जात होतं. मात्र आता हे संकट टळलं आहे. गोपाळ शेट्टींनी माघार घेण्याआधी भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडेंनीही त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर, तावडेंनी आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन, "मी कधीच भाजपा सोडणार नाही, असं गोपाळजी शेट्टींनी सांगितलं देवेंद्र फडणवीस आणि शिवप्रकाशजींना भेटल्यावर सांगितलं. पक्षाला नुकसान होईल असं काहीही करणार नाही," असं स्पष्ट केलं आहे.

नक्की वाचा >> Maharashtra Assembly Election: ...तर मला अटक करतील; जाहीर सभेत CM शिंदेंनी व्यक्त केली भीती

अगदी सोमवारी रात्री मुंबई  भाजपाच्या या वरिष्ठ नेत्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही या नेत्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळेच भाजपाला या हक्काच्या मतदारसंघामध्ये फटका बसू शकतो.