मुंबई : ‘टाळेबंदी’नंतर परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी मुंबई, पुण्यातून विशेष गाड्या सोडण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवून केली लआहे. कोरोनाचे संकट असल्याने केंद्र सरकारने लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीची मुदत ३ मे रोजी संपत आहे. टाळेबंदीची मुदत संपल्यानंतर रेल्वेसेवा सुरु झाल्यास, महाराष्ट्रात ठिकठिकाणी थांबलेले परप्रांतीय मजूर बांधव आपापल्या गावी परतण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची व त्यामुळे गर्दी उसळून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे गाड्या सोडण्यात याव्यात, असे ते म्हणालेत.
रेल्वे मंत्रालयाने मुंबई आणि पुणे येथून देशाच्या विविध भागात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात. तसेच त्यासाठीचे नियोजन आधीच करावे, असे आवाहन यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना लिहिले पत्रात केल आहे. अजित पवार यांनी परप्रांतीय मजुरांच्या मुद्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची विनंती केली आहे.
BreakingNews । उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना पत्र । टाळेबंदीनंतर परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी मुंबई, पुण्यातून विशेष गाड्या सोडण्याची मागणी @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @PiyushGoyalOffc #CoronaVirus #Lockdown @ashish_jadhao
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 23, 2020
केंद्र सरकारने २४ मार्चपासून देशव्यापी टाळेबंदी लागू केल्यापासून उत्तरप्रदेश, बिहारसह देशाच्या विविध राज्यातील मजूरबांधव महाराष्ट्रात ठिकठिकाणी अडकून आहेत. राज्य शासनातर्फे त्यांच्यासाठी शिबीरव्यवस्था केली आहे. त्यांना निवास, भोजन, आरोग्यसेवा पुरवण्यात येत आहे. राज्यशासनाच्या शिबिरांमध्ये आजमितीस साडेसहा लाख मजूरबांधव राहत आहेत. स्वयंसेवी संस्थांद्वारेही तितक्याच मजुरांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
टाळेबंदीमुळे राज्यातील उद्योग, बांधकाम. सेवाक्षेत्र बंद असल्यामुळे या मजुरांच्या हाताला काम नाही. दीड महिन्यांपासून शिबिरात राहिल्यामुळे ही मंडळी आपापल्या घरी, कुटुंबात जाण्यास अधीर आहेत. पहिल्या देशव्यापी टाळेबंदी समाप्तीच्या दिवशी मुंबईतील वांद्रे परिसरात उसळलेली गर्दीचे उदाहरण दिले आहे. रेल्वे मंत्रालयाने या वस्तुस्थितीचा विचार करुन केंद्र सरकारतर्फे याचा विचार व्हावा, असे म्हटले आहे.
महाराष्ट्रातील परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी, मुंबई आणि पुणे येथून विशेष रेल्वेगाड्या सोडल्यास, या मजुरांना सुरक्षित घरी जाता येईल. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका टाळता येईल. महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य असल्याने, तसेच येथील बांधकाम व्यवसाय मोठा असल्याने उत्तरप्रदेश, बिहारसह इतर राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीय मजुरांची संख्या देशात सर्वाधिक आहे. हे मजूर असंघटीत क्षेत्रात रोजंदारीवर काम करतात, असे पत्रातून लक्षात आणून देण्यात आले आहे.
टाळेबंदीमुळे दीड महिन्यांपासून ते शिबिरात आहेत. ते मजूर आपापल्या गावी परतण्यास अधीर आहेत. ते टाळेबंदी संपल्यानंतर मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची शक्यता आहे. या शक्यता गृहीत धरुन रेल्वेमंत्रालयाने मुंबई आणि पुणे येथून, या परप्रांतीय मजूरांना त्यांच्या गावी घेऊन जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन पुरेसा कालावधी शिल्लक असतानाच करावे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.