अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : खान्देशातील लोकांनी ज्या रेल्वेवर जीवापाड प्रेम केले त्या शकुंतला रेल्वेच्या पुर्नरुज्जीवनचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मीटर गेज असलेल्या शकुंतला रेल्वेचे ब्रॉड गेजमध्ये रुपांतर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 50 टक्के भागीदारी करण्याचे तत्वतः मान्य केले आहे. यामुळे ही रेल्वे लवकरच कात टाकणार आहे.
ही रेल्वे मागास भागांतून जात असल्यानं सरकारने रेल्वेबरोबर भागीदारी करत प्रकल्पाचा अर्धा खर्च उचलण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
रेल्वे अर्थसंकल्पात या मीटर गेजच्या रेल्वेचे ब्रॉड गेजमध्ये रुपांतर करण्याची रेल्वेने तयारी दाखवली होती. मात्र या प्रकल्पाचा खर्च तब्बल 2300 कोटी रुपयांच्या घरांत आहे. एवढा खर्च करायला रेल्वे तयार नव्हती, त्यामुळे अत्यंत तोट्यात आणि रखडत चालणा-या शकुंतला रेल्वेचे भवितव्य धोक्यात आले होते.
तेव्हा राज्य शासनाने भागीदारी करण्याचा निर्णय घेतल्यानं भविष्यात शकुंतला रेल्वे अधिक वेगवान आणि प्रवाशांसाठी फायद्याची होणार आहे.
शकुंतलाविषयी महत्वाचे...
1903 ला कापसाच्या वाहतुकीकरता शकुंतला रेल्वे एका खाजगी खंपनीने सुरु केली
कंपनीने ब्रिटीश सरकारबरोबर 100 वर्षांचा करारही केला
मुर्तिजापूर ते यवतमाळ ( 113 किमी ), मुर्जिजापूर ते अचलापूर ( 77 किमी ), पुलगांव - आर्वी ( 35 किमी ) असा शकुंतला रेल्वेचा मार्ग
काळाच्या ओघात या मार्गाचा वापर प्रवासी वाहतुकीकरता सुरु झाला
1947 नंतर ही रेल्वे चालवण्याची जवाबदारी संबंधित कंपनीकडून भारतीय रेल्वेने घेतली
अत्यंत कमी भाडे असल्यानं गरीबांना परवडणारी रेल्वे अशीही या रेल्वेची ओळख झाली
शकुंतला रेल्वेमधून तोटा होत असल्यानं सेवा सुरु ठेवणे रेल्वेकरता डोकेदूखी ठरली आहे
मात्र लोक आग्रहास्तव शकुंतला रेल्वे सुरु ठेवली जात आहे
आता मीटर गेजचे रुपांतर ब्रॉड गेजमध्ये करतांना राज्य शासन अर्धा खर्च उचलणार
शकुंतला रेल्वे लवकरच कात टाकणार