मुंबई : कंगनाच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीये. मुंबई बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे तिच्या अडचणी वाढल्या आहेत. कंगनाच्या मुंबईतील पाली हिल येथील कार्यालयावर सोमवारी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अचानक धाड टाकली होती. यानंतर आता मुंबई महापालिकेचे पुढील लक्ष्य कंगनाचे खारमधील घर आहे.
२०१८ मध्ये मुंबई महापालिकेनं फ्लॅटमध्ये एफएसआयचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंगनाला एमआरटीपी नोटीस दिली होती. खार रोड, पश्चिम येथील १६ व्या रोडवर डिब्रीझ ( DrBreez) अपार्टमेंटमध्ये तिचा फ्लॅट आहे. मुंबई महापालिकेच्या एमआरटीपी नोटीस विरोधात तिनं दिंडोशी कोर्टात दाद मागितली होती. त्यावेळी कोर्टानं कंगनाची बाजू ऐकून घेत पुढील कारवाईस स्टे दिला आणि पालिकेला यावर सविस्तर म्हणणं मांडण्यास सांगितले होते.
गेल्या दोन वर्षात पालिकेनं काहीच म्हणणं कोर्टात मांडले नव्हते, परंतु आता कंगनाला घेरण्यासाठी दोन दिवसांपूर्वी कोर्टात पालिकेनं आपलं म्हणणं मांडलं आहे. तसंच याप्रकरणी दिलेला स्टे मागे घेण्याची विनंती कोर्टात केली आहे. कोर्टानं स्टे उठवल्यास कंगनाच्या फ्लॅटमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामावर पालिका कारवाई करू शकते.