मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पावसाळ्यात अॅप चेक करा मगच बाहेर पडा

पावसाळ्यात कोणत्या ठिकाणी पाणी साचलंय? कोणते रस्ते बंद आहेत? पाहा कसं कळणार आधी

Updated: Jun 2, 2022, 08:15 PM IST
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पावसाळ्यात अॅप चेक करा मगच बाहेर पडा  title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : देशातील सर्वात मोठी महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) लवकरच आपत्ती व्यवस्थापन बीएमसी (Disaster Management BMC) नावाचं एक मोबाइल अॅप (Mobile APP) लॉन्च करणार आहे, जे मुंबईकरांना शहरातील पावसाळ्याच्या परिस्थितीबद्दल माहिती देईल. 

त्याशिवाय अॅप पाणी साचलेली क्षेत्रे, भरती-ओहोटी, वेगवान वादळ आणि पावसाची परिस्थिती देखील दर्शवेल.  BMC अॅप आगामी दहा ते बारा दिवसांमध्ये Android आणि आयफोनवर नागरिकांना डाऊनलोड करता येईल. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, घरातून बाहेर पडण्यापूर्वीच मुंबईतील लोक कोणते रस्ते पाण्याने भरलेले आहेत किंवा कोणत्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे हे पाहता येईल. अशा प्रकारची सुविधा मुंबईकरांसाठी महापालिका प्रथमच उपलब्ध करुन देत आहे. 

अॅपद्वारे कोणकोणती माहिती नागरिकांना मिळणार 
या अॅपच्या मदतीने मुंबईकरांना पावसाळ्यातील शहराची स्थिती 6 ते 72 तास अगोदर कळविली जाईल. विविध प्रकारच्या डेटाचा वापर करून बीएमसी आपल्या अंदाज विश्लेषणाद्वारे ही माहिती मुंबईकरांशी शेअर करेल. बीएमसीचा दावा आहे की हे अॅप 6 तास ते तीन दिवस अगोदर कोणत्या रस्त्यावर कोणत्या वेळी पाणी साचू शकते याची माहिती देईल. 

महानगरपालिकेने म्हटले आहे की हे अॅप क्षेत्राचे अनुमानित विश्लेषण देण्यासाठी IMD चा डेटा तसंच स्थानिक डेटा वापरेल. त्या भागातील ड्रेनेजची स्थिती काय आहे, पायाभूत सुविधा, किती लोकसंख्या आहे?  या सारखा डेटा वापरला जाईल. याद्वारे लोकांना हवामान, भरती-ओहोटी, वेगवान वादळ, पावसाची परिस्थिती, पाणी साचण्याची माहिती मिळेल. बीएमसीला आशा आहे की या अॅपचा लोकांना फायदा होईल आणि पावसाच्या दिवसांमध्ये बाहेर जायचं असल्याचं हे अॅप खूप उपयुक्त ठरू शकतं. 

बीएमसी करणार तातडीची कारवाई
कोणत्याही भागात पाणी साचण्याची समस्या उद्भवल्यास बीएमसी तातडीने पथक पाठवून कारवाई करेल, असा दावा केला आहे.  त्याचबरोबर अॅप, सोशल मीडिया आणि मुंबई पोलिसांच्या सहाय्याने रस्त्यावरील अडथळे आणि अति पावसाळ्याची स्थिती याबाबत जनतेला माहिती दिली जाणार आहे. 

दरम्यान या ऍपवर नागरिक फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करुन तक्रार करु शकणार नाहीत. कारण जर कोणी याचा गैरवापर किंवा चुकीची माहिती मिळाली तर त्यामुळे काही अडचणी किंवा समस्या निर्माण होऊ शकतात.