Covid-19 : गरिबांना मोफत लस देणार - राजेश टोपे

 COVID19 vaccine : गरिबांवर लसीकरणाचा ५०० रूपयांचा खर्च लादणे योग्य नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. 

Updated: Jan 5, 2021, 02:15 PM IST
Covid-19 : गरिबांना मोफत लस देणार - राजेश टोपे  title=

मुंबई : राज्यात (Maharashtra) गरिबांना मोफत लस (COVID19 vaccine)उपलब्ध करून द्या, अशी मागणी राज्य सरकार केंद्राकडे करणार आहे. श्रीमंत लोक लस ( vaccine) विकत घेऊ शकतात. मात्र, गरिबांवर लसीकरणाचा ५०० रूपयांचा खर्च लादणे योग्य नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. केंद्राने गरीबांना लस (Corona vaccine) मोफत दिली नाही तर राज्य सरकार विचार करेल, असे राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटले आहे. 

राज्यात सध्या नव्या कोरोनाचे ८ रूग्ण आढळले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. या आठ रूग्णांच्या संपर्कात कोणकोण आले होते. त्याची माहिती घेतली जात आहे. मात्र अजूनही कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये कोणी पॉझिटिव्ह आढळले नाहीत, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यात लसीकरणासंदर्भात ८ जानेवारीला सर्व जिल्ह्यात ड्राय रन घेण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूमुळे राज्यात अधिक दक्षता घेतली जात असली तरी परदेशातून अन्य राज्यात उतरून तेथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता अशा प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी यासंदर्भात मुख्य सचिवांना निर्देश दिले. 

ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे व टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

कोरोना लसीकरणाचा ड्राय रन नुकताच झाला. आता केंद्र शासनाकडून लस मिळाल्यानंतर प्रत्यक्षात लसीकरणाला सुरूवात होईल. त्याबाबतच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले, ब्रिटनमधून थेट मुंबईत उतरलेल्या प्रवाशांना नियमाप्रमाणे विमानतळावरून संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्यात येते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून असे निदर्शनास आले आहे की, इतर राज्यातील विमानतळांवर उतरून प्रवासी देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येतात. त्यामुळे त्यांचा मागोवा काढणे शक्य होत नाही. केंद्र सरकारने अशा परदेश प्रवास करून आलेल्यांना त्या-त्या विमानतळांवरून क्वारंटाईन करावे, असे  ठाकरे यांनी सांगितले.