कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई : बाळंतिणींच्या मृत्यूला अन्य आजारांपेक्षाही कोविड 19 जास्त कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे. साधारणतः बाळंतिणींच्या मृत्यूला हॅमरेज, कावीळ, सेप्सिस किंवा हायपसेंसिटीव्ह डिसॉर्डर जबाबदार असतात. मात्र आता हाती आलेली आकडेवारी कोरोना हे मृत्यूंचं मुख्य कारण झाल्याचं सांगतेय.
एप्रिल 2020 ते मार्च 2021 या काळात मुंबईत 193 बाळंतिणी दगावल्यात. यात तब्बल साडेसोळा टक्के मृत्यू हे कोरोनानं वाढवलेल्या समस्यांमुळे झालेत. रक्ताचा विकार असलेल्या सेप्सिसमुळे 12 टक्के, तर टीबी आणि हॅमेरेजमुळे प्रत्येकी 8 टक्के मृत्यू झालेत. हृदयविकारामुळे 4 टक्के बाळंतिणींचा बळी गेलाय.
मुंबई महापालिका रुग्णालयातील ही आकडेवारी चेतन कोठारी यांनी माहिती अधिकारात मिळवलीये. 'मुंबईतल्या सरकारी रुग्णालयातील हा आकडा आहे, यात खासगी रुग्णालयातील आकडेवारी धरली तर हा आकडा मोठा असू शकतो' असं चेतन कोठारी यांनी म्हटलं आहे.
मुंबईत यंदाच्या वर्षात बाळंतिणींच्या मृत्यूचं प्रमाण कमी झालंय. याचं मुख्य कारण बाळंतपणं कमी झालीयेत हे असावं. मात्र कोरोना होणं बाळंतिणींसाठी धोकादायक असल्याचं ताजी आकडेवारी सांगतेय. त्यातही दुसरी लाट अधिक घातक असल्याचं स्पष्ट झालंय. 'दुसऱ्या लाटेचा धोका अधिक आहे, कोरोनाचे नवे व्हेरिएंट घातक ठरत असल्याचं' स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर नीरज महाजन यांनी म्हटलं आहे.
कोविड 19 व्हायरस हा फुफ्फुसांवर आघात करतो. मात्र अन्य महत्त्वाच्या अवयवांनाही त्याचा धोका असल्याचं समोर येतंय. त्यामुळे बाळ-बाळंतिणीला सुखरूप ठेवायचं असेल, तर घरातल्या सर्वांनीच योग्य खबरदारी घेतली पाहिजे.