नवी मुंबईत महाविकासआघाडीची गणेश नाईकांना धक्का देण्याची तयारी

नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाविकासआघाडी एकत्र येण्याची शक्यता.

Updated: Feb 4, 2020, 02:54 PM IST
नवी मुंबईत महाविकासआघाडीची गणेश नाईकांना धक्का देण्याची तयारी title=

दीपक भातुसे, झी मीडिया, नवी मुंबई : येत्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीने कंबर कसली आहे. राज्याच्या सत्तेत एकत्र असलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीनही पक्ष या निवडणुकीत एकत्र येऊन नवी मुंबईतील गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीचा पहिला जाहीर मेळावा आज नवी मुंबईतील वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. 

नवी मुंबईत आधी राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं. मात्र गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या तब्बल 46 नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीला धक्का दिल्यानंतर आता स्वतः शरद पवारांनी नाईक यांना धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी तीन पक्ष एकत्र येऊन नवी मुंबई महापालिकेची निवडणूक लढवत असून त्याचे रणशिंग आज महाराष्ट्र विकास आघाडीच्या मेळाव्याद्वारे फुंकले जाईल.

नवी मुंबईत आज महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांचा एकत्र मेळावा होत आहे. याआधी सोमवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठकी झाली. एप्रिलमध्ये नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होणार असून यासाठी महाविकासआघाडी एकत्रित येण्याची दाट शक्यता आहे. शरद पवारांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे कॅबिनेटमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

भाजपला आणि खास करुन राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या गणेश नाईकांना शह देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवू शकतात.