'केंद्र सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न', सोनियांसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा आरोप

युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली.

Updated: Aug 26, 2020, 05:59 PM IST
'केंद्र सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न', सोनियांसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा आरोप title=

मुंबई : युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना घाबरून राहायचं, का त्यांच्याशी लढायचं? हे ठरवणं गरजेचं असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केलं. भाजपेत्तर मुख्यमंत्र्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे सगळ्या भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांनी आवाज उठवायला हवा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच केंद्र सरकारविरोधात एवढा मोठा आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे. 

उद्धव ठाकरे यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही.नारायणस्वामी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि हेमंत सोरेन उपस्थित होते. जीएसटी, राज्यांची आर्थिक स्थिती, कोरोना, लॉकडाऊन, जेईई-नीट परीक्षा या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. 

ममता बॅनर्जी यांनी या बैठकीत उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. उद्धव ठाकरे कोरोनाशी चांगल्या पद्धतीने लढत आहात, असं ममता म्हणाल्या. तेव्हा मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.