प्रदीप शर्मांच्या 'राजकीय एन्काऊंटर'साठी दिव्या साळसकर मैदानात

'प्रदीप शर्मासारख्या भ्रष्ट माणसाशिवाय शिवसेनेला दुसरा मराठी उमेदवार सापडला नाही का?'

Updated: Oct 18, 2019, 09:06 PM IST
प्रदीप शर्मांच्या 'राजकीय एन्काऊंटर'साठी दिव्या साळसकर मैदानात  title=

देवेंद्र कोल्हटकर-प्रथमेश तावडे, झी २४ तास, मुंबई : नालासोपारा विधानसभा मतदारसंघात प्रदीप शर्मा विरुद्ध क्षितीज ठाकूर यांच्यातील लढतीला आता वेगळंच वळण लागलंय. एकेकाळचे एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा 'राजकीय एन्काऊंटर' करण्यासाठी जोरदार फिल्डिंग लागलीय. पोलिसाची खाकी वर्दी सोडून, राजकारणाची खादी अंगावर घालणाऱ्या प्रदीप शर्मांची डोकेदुखी वाढलीय. नालासोपारा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर ते विधानसभा निवडणूक लढवत आहेत. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांचं कडवं आव्हान त्यांच्यासमोर आहे. 

वसई-विरारमधील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचा दावा एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा करत आहेत. पण एकेकाळचे त्यांचे सहकारी आणि शहीद विजय साळसकर यांची कन्या दिव्या साळसकर यांनी इन्स्टाग्रामवरून क्षितीज ठाकूर यांना समर्थन दिल्यानं एकच खळबळ उडालीय.

राज्याच्या किंवा देशाच्या राजकारणात क्षितीज यांच्याप्रमाणं हार्वर्ड संस्थेत शिक्षण घेतलेल्या थोडक्याच व्यक्ती असाव्यात. क्षितीज यांच्यासारखे तरुण देशाचा खऱ्या अर्थानं विकास घडवू शकतात, असं दिव्या साळसकर यांनी म्हटलंय.

शहीद साळसकर आणि प्रदीप शर्मा हे दोघेही १९८३ च्या बॅचचे पोलीस अधिकारी... दोघेही एन्काऊंटर स्पेशालिस्ट... पण एकेकाळचे हे मित्र नंतर एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनले. आता साळसकरांच्या कन्येनं ठाकूरांना पाठिंबा जाहीर करून जुना हिशेब चुकता केल्याची चर्चा आहे.

हे कमी झालं म्हणून की काय, लखनभय्या एन्काऊंटरचं भूत पुन्हा एकदा शर्मांच्या मानगुटीवर येऊन बसलंय. शर्मा यांनी केलेले लखनभय्यासारखे अनेक एन्काऊंटर बोगस होते. त्यांच्यासारख्या भ्रष्ट माणसाशिवाय शिवसेनेला दुसरा मराठी उमेदवार सापडला नाही का? असा सवाल लखनभय्याचा भाऊ राम प्रसाद गुप्ता यांनी केलाय.

निवडणुकीला अवघे तीन दिवस उरले असताना प्रदीप शर्मा अडचणीत आलेत. या परिस्थितीचा मुकाबला ते कसा करतात, याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.