मुंबई : थापेबाजी करण्यात भाजपचा कोणीही हात धरू शकत नाही, असा हल्लाबोल शिवसेनेने केला आहे. एलफिस्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण आणि पीयूष गोयल यांच्यासोबत स्टेशन परिसराला भेट दिली. त्यानंतर शिवेनेने प्रतिक्रीया दिली आहे.
मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या पहाणी दौऱ्यानंतर शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी तीखट प्रतिक्रीया दिली आहे. सावंत यांनी म्हटले आहे की, थापा आणि नाटकबाजीत भाजपचा हात कोणीही धरू शकत नाही.
दरम्यान, एलफिस्टन येथील घटनास्थळाला भेट दिल्यावर मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. ते म्हणाले, लष्कराकडे आपतकालीन काळात ब्रीज बांधण्याचे तंत्रज्ञान आहे. कमीत कमी वेळेत ब्रीजचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. तीन रेल्वे स्थानकातील फुटओव्हर ब्रीज बाधण्याचं काम करण्यात येणार आहे. यामध्ये एलफिन्स्टन, करी रोड, आंबिवली रेल्वे स्थानकातील एफओबीचा समावेश आहे. ३१ जानेवारीपर्यंत फुटओव्हर ब्रीज बांधण्याचं काम पूर्ण होणार आहे अशी माहितीही मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे.