मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. कोरोनाचे आणि इतर आजारांच्या रुग्णांच्या मदतीसाठी सरकारने हॉस्पिटलबाबतची सगळी माहिती देणारं मोबाईल ऍप तयार करावं, अशी मागणी अमित ठाकरेंनी या पत्रात केली आहे.
महाराष्ट्रात कोरोना वायरस (covid 19) व अन्य आजारांच्या उपचारासाठी जी रुग्णालये कार्यरत आहेत, त्यांच्या बेड्सची क्षमता स्पष्टपणे नागरिकांना कळावी ह्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत ऍप विकसित करावं अशी सूचना पक्षाचे नेते श्री. अमित ठाकरे ह्यांनी मुख्यमंत्री महोदयांना केली आहे. pic.twitter.com/I3FWTiIrtD
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 3, 2020
राज्यात कोरोनासाठी आणि इतर आजारांसाठी जी हॉस्पिटल आहेत, त्यांच्या बेडची क्षमता नागरिकांना माहिती नाही. ऐन आजारात रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आमच्या हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाहीत, तुम्ही दुसऱ्या रुग्णालयात जा, असे सांगण्यात येत आहे.
बहुतेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडे सध्या एन्ड्रॉईड मोबाईल आहे. त्यामुळे सगळ्या हॉस्पिटलना जोडून एक मोबाईल ऍप तयार करावा. या ऍपमध्ये कोरोना आणि अन्य आजारांच्या हॉस्पिटलची माहिती आणि बेडची माहिती द्यावी. ही माहिती रोज अपडेट केल्यास रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होणार नाही. त्यामुळे अशाप्रकारचं ऍप तयार करण्याची विनंती अमित ठाकरेंनी राज्य सरकारला केली आहे.
कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सची खाण्याची आबाळ होऊ नये, त्यांना पौष्टिक आणि पटकन खाता येतील असे खाद्यपदार्थ मिळावेत ह्या उद्देशाने श्री. अमित ठाकरे ह्यांनी उच्च प्रथिनं असलेली खाद्य पदार्थांची ४००० पाकिटं महाराष्ट्र निवासी डॉक्टर राज्यव्यापी संघटनेला सुपूर्द केली. pic.twitter.com/7yWvTjWBeS
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 3, 2020
अमित ठाकरे यांनी महाराष्ट्रातील डॉक्टरांसाठी हायप्रोटीन्स युक्त खाद्य पदार्थ दिले. मार्डचे अध्यक्ष श्री.राहल वाघ आणि त्यांच्या टीमकडे अमित ठाकरेंनी हे खाद्य सुपूर्त केलं. अमित ठाकरेंनी ४ हजार प्रोटीन्सयुक्त खाद्य पदार्थाचे पॅकेट सरकारी निवासी डॉक्टरांसाठी उपलब्ध करुन दिले.