प्रशांत अंकुशराव / मुंबई : जिवंत माणसाचे विमानातून प्रवास करताना माणशी तिकीट आकारले जाते. मात्र माणूस मेल्यावर त्याच्या वजना प्रमाणे विमानाचा दर ठरतो. हे अतिशय धक्कादायक आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे म्हणून दुबईतले समाजसेवक अश्रफ ताम्रशरी लढा देत आहेत. पूर्वापार चालत आलेली व्यवस्था आता बदलण्याची वेळ आली आहे. अश्रफ यांच्यासारखे दुबईतले कार्यकर्ते भारतात हा बदल घडावा यासाठी प्रयत्न करत आहेत.
अश्रफ ताम्रशरी हे दुबईचे व्यवसायिक. मात्र त्यांचे व्यवसायाव्यतिरिक्त सामाजिक भान जपत अनेक महत्त्वाच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने विविध स्तरावर लढा देत आहेत. भारतातून किंवा संपूर्ण जगातून अनेक जण पोटाची खळगी भरण्यासाठी दुबईत येतात. त्यात कामगार वर्गाची संख्या मोठी असते. यातच जर कोणाचा मृत्यू झाला तर त्याचा मृतदेह स्वखर्चाने त्याच्या कुटुंबीयांना पाठवण्याची व्यवस्था अश्रफभाई करतात. आत्तापर्यंत ५०००हून अधिक जणांचे मृतदेह अश्रफभाईंनी नातेवाईकांना सुपूर्द केलेत.
मात्र हे काम करताना एका धक्कादायक प्रथेविरोधात त्यांनी आता लढा सुरू केला आहे. विमान कंपन्या मृतदेहाच्या वजनानुसार दर आकारतात. या माणुसकीशून्य प्रकाराला अश्रफभाईंचा विरोध आहे. मृतदेहाची विटंबना एवढ्यावर थांबत नाही. मुंबईत पोहोचल्यावर सुमारे ३ ते ४ तास विमान कंपन्या कार्यवाही पूर्ण करीत नाही. यावर अल्पसंख्य आयोगामार्फत मुख्यमंत्री, पंतप्रधानांना पत्र लिहून विनंती करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात, राजस्थान हज कमिटी अध्यक्ष अमीन पटेल यांनी दिली.
जिवंतपणी माणसाला किंमत नसली तरी मेल्यावर त्याच्या मृतदेहाची किंमत वजनाने मोजावी लागत असल्याचे दुर्दैव आजही सुरुच आहे. पूर्वापार चालत आलेली व्यवस्था बदलण्यासाठी अश्रफ प्रयत्न करत आहे. अश्रफ हे दुबईतले कार्यकर्ते भारतात हा बदल घडावा यासाठी झटत आहेत.