बीड: आरक्षणाच्या मागणीसाठी यापूर्वी राज्यभर शांततेत मूक मोर्चा काढणाऱ्या मराठा समाजाने जिल्ह्यात ठोक मोर्चे काढायला सुरुवात केली आहे. तुळजापूर नंतर परळी येथे मराठा समाजाने भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आला. आरक्षण देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला.
परळी तहसीलसमोर रात्रभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत मुख्यमंत्री कार्यालयाकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिल्याने प्रशासन हतबल झाले आहे. रात्रभर या आंदोलकांनी भजन कीर्तन करीत आपले आंदोलन सुरू ठेवले.
कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक ठिय्या आंदोलन करण्यात आल्याने पोलीस आणि महसूल प्रशासनाची झोप मात्र उडाली आहे. बुधवारी सायंकाळपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन गुरुवारी सुद्धा सुरूच आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजातर्फे पुन्हा एकदा आंदोलनाच हत्यार उपसण्यात आले आहे. नवी मुंबईतील वाशी येथेही मराठा समाजातर्फे बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्यात आले आहे. मुंबई, ठाणे व पनवेल मधील समाज बांधव या ठिय्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. वाशीच्या शिवाजी चौकात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देत या बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरवात झाली.