गिलला Attitude दाखवणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचा माज विराटने क्षणात उतरवला; भन्नाट Video पाहाच

Abrar Ahmed Shubman Gill Virat Video: भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यानचे मैदानावरील ते दोन व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 24, 2025, 12:54 PM IST
गिलला Attitude दाखवणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचा माज विराटने क्षणात उतरवला; भन्नाट Video पाहाच
सामन्यातील दोन्ही क्षण चर्चेत

Abrar Ahmed Shubman Gill Virat Video: पाकिस्तान यजमान असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेमधून भारताने पाकिस्तानलाच बाहेर काढलं आहे. रविवारी दुबईमधील अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील निर्णायक सामन्यामध्ये विराट कोहलीच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानला 6 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यामध्ये विराटने केवळ सामना जिंकून दिला नाही तर पाकिस्तानी गोलंदाजीची पिसं काढली असंही म्हणता येईल. विशेष म्हणजे कोहलीचं संयमी पण त्यातही तांत्रिक फटकेबाजी करणारं रुप या खेळीत पाहायला मिळालं. या खेळीदरम्यान विराटने त्याचा संघ सहकारी शुभमन गिलला बाद केल्यानंतर डिवचणाऱ्या पाकिस्तानी फिरकीपटूलाही अनोख्या पद्धतीने उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. 

विराट आणि गिलची पार्टनरशीप

भारताने 242 धावांचा पाठलाग सुरु केल्यानंतर पाचव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर भारताला कर्णधार रोहित शर्माच्या रुपाने पहिला धक्का बसला. शाहीन शाह आफ्रिदीच्या अप्रतिम यॉर्करवर रोहित बोल्ड झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहलीबरोबर शुभमन गिलची चांगली जोडी जमली. शुभमन आणि विराटने हळूहळू जम बसवला. एक-एक, दोन-दोन धावा काढतानाच एखाद्या वाईट चेंडूवर दोघे चौकार, षटकार लगावत लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत होते. दोघांमध्ये 69 धावांची पार्टनरशीप झाली अन् ही जोडी फोडण्यात पाकिस्तानला यश आलं.

भन्नाट चेंडूवर गिल क्लिन बोल्ड

बाद होण्यापूर्वी शुभमन गिलने 51 बॉलमध्ये 46 धावांपर्यंत मजल मारली होती. अर्धशतकापासून केवळ एक चौकार दूर असतानाच सात चौकार मारलेला शुभमन बाद झाला. 18 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर फिरकीपटू अबरार अहमदचा चेंडू खेळून काढण्याच्या नादात शुभमन क्लिन बोल्ड झाला. अबरारने टाकलेला चेंडू मधल्या स्टम्पवरुन बाहेर वळला आणि त्याने मधला आणि ऑफ स्टम्प उडवला. हा फिरणारा चेंडू एवढ्या वेगाने आला की शुभमनला काही कळलंच नाही. तो केवळ उद्धवस्त झालेल्या यष्ट्यांकडे पाहत राहिला. विराट कोहलीनेही मान डोलवून चेंडूच इतका उत्तम होता की शुभमनची काही चूक नव्हती असं दर्शवलं. 

विकेट घेतल्यावर दाखवला माज

शुभमनला बाद केल्यानंतर अबरार अहमदनेही अगदी हाताची घडी घालून मान उडवत माज दाखवल्याप्रमाणे भारतीय उपकर्णधाराला निरोप दिल्याचं पाहायला मिळालं. मात्र समालोचकांपासून इंटरनेटवरील अनेकांनी शुभमनची विकेट घेणाऱ्या अबरारच्या या चेंडूचं कौतुक केल्याचं पाहायला मिळत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

विराटने अशापद्धतीने माज उतरवला

मात्र एकीकडे अबरारने असा माज दाखवला असताना दुसरीकडे भारत आता जवळपास सामना जिंकणार असं स्पष्ट झाल्यानंतर विराटने शांततेत अबरारचा हा माज उतरवला. सामान्यपणे जशात तसं उत्तर देणाऱ्या विराटने अगदीच संयमाने अबरारने त्याच्या वाट्याच्या 10 ओव्हर टाकून झाल्यानंतर त्याच्या जवळ जात हस्तांदोलन करुन त्याचं कौतुक केलं. हा व्हिडीओ आयसीसीनेच पोस्ट केला आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

चाहते म्हणाले, त्याने पाकिस्तानी संघाला घरी पाठवलं

विराटच्या या कृतीवरुन चाहत्यांनी अबरारने माज दाखवत गिलला निरोप दिला आणि विराटने शांततेत पाकिस्तानी संघाला पुन्हा पाकिस्तानात पाठवलं, असा टोला लगावला आहे.

भारताचा पुढचा पेपर अजून कठीण

भारताचा पुढील सामना 2 मार्च म्हणजेच येत्या रविवारी होणार आहे. हा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार असून भारताची खरी कसोटी या सामन्यात लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारताला कधीच फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. अगदी वर्ल्डकप असो किंवा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप असो भारताला न्यूझीलंडने अनेकदा पराभूत केलं आहे. त्यामुळेच आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ हा पुढचा कठीण पेपर कसा सोडवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.