मुंबई : प्रदूषण मुक्त दिवाळी या झी २४ तासच्या उपक्रमामध्ये राज्यभरातील शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अंतर्गत शाळेतील विद्यार्थी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेत आहेत.
नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातल्या लासलगावच्या जिजामाता प्राथमिक शाळेने उत्स्फुर्त सहभाग घेतला. दिवाळीतील फटाक्यांचा आवाज आणि धूर यामुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली.
सातारा जिल्ह्यातल्या कराडमधल्या शाळेत प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ घेण्यात आली.
कराड तालुक्यातली ISO मानांकन मिळालेली नगरपालिका शाळा क्रमांक तीन या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी फटाके न फोडण्याची शपथ घेतली. त्याचबरोबर या दिवाळीत गरीब आणि गरजूंना मदत करण्याची शपथही विद्यार्थ्यांनी घेतली. झी २४ तासच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमामुळे समाज परिवर्तन होईल, असा विश्वास विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला
चंद्रपूर शहरातल्या पंजाबराव देशमुख विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीहा यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त करण्यासाठी शपथ घेतलीय. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्हा देशातल्या प्रदूषित जिल्ह्यांच्या यादीत पहिल्या दहांमध्ये आहे. चंद्रपुरात मुळातच मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे. त्यावर नियंत्रण आणणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे झी २४ तासचा फटाकेमुक्त दिवाळी अभियान कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी आणि शिक्षकांनी दिली आहे.