जबाबदार कोण? शॉक लागून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू

पुण्यातल्या घटनेने खळबळ, तरुणाच्या कुटुंबाला धक्का  

Updated: Jul 12, 2022, 09:04 PM IST
जबाबदार कोण? शॉक लागून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : गेल्या चार दिवसांपासून पुण्यात पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडपडी, घरे पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच आज पुण्यातील दत्तवाडी परिसरात हायटेन्शनची वायर तुटून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

रोहित संपत थोरात (वय 20) असं मृत झालेल्या मुलाचं नाव असून तो भाजीविक्रेत्याचा मुलगा असल्याची माहिती समोर येत आहे.  दत्तवाडी इथल्या सिंहगड रोड इथं हॉटेल सवाईजवळ विजेची हायटेन्शनची वायर जाते. मात्र पावसामुळे वायर अचानक तुटली आणि रस्त्यावर पडली.

दुर्वेदी तुटलेली वायर रोहितच्या अंगावर पडली आणि त्याला शॉक बसला. यात रोहितचा जागीच मृत्यू झाला. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. तरुण मुलगा गेल्याने थोरात कुटुंबाला धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.