Sanjay Shirsat on Shivsena: राज्यात रोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. अनेक नेते पक्षांतर करुन दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. यादरम्यान आपल्या पक्षात इन्कमिंग सुरु असल्याचे अनेक मोठे दावेही केले जात आहेत. त्यातच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी शुक्रवारी एक मोठं विधान केलं होतं. दोन्ही शिवसेना एकत्र करण्यासाठी गरज पडल्यास आम्ही प्रयत्न करू असं ते म्हणाले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपल्या विधानावरुन माघार घेतली आहे.
दोन्ही शिवसेना एकत्र करण्यासाठी गरज पडल्यास आम्ही प्रयत्न करू असं संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं. मात्र दोन्ही शिवसेना एकत्र आणण्याबाबत आधी बोलले आणि नंतर सार्वजनिक पत्रकार परिषदेत थेट उलटी भूमिका घेतली. काल मी जे वक्तव्य केलं त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. शिवसेना फुटू नये या मताचे आम्ही होतो. मी काही वेगळे प्रयत्न करेल असे समजण्याचे कोणतेही कारण नाही. भविष्यात जे घडेल त्याचा आनंदच आहे, असं म्हणत त्यांनी आपल्या विधानावरुन यु-टर्न घेतला आहे.
" उद्धव ठाकरे यांना सत्तेचा मोह होता. सत्तेच्या मोहापायी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले. उद्धव ठाकरे यांनी राजा म्हणून राज्य करावं आणि आम्ही सेवक म्हणून कारभार केला असता. सत्तेसाठी शिंदे बाहेर पडले नव्हते. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्याचा राग होता," असं संजय शिरसाट म्हणाले.
पुढे त्याने सांगितलं की, "येणारी मनपा निवडणूक झाल्यावर त्यांना (उद्धव ठाकरे) कळेल की खूप मोठी चूक झाली आहे. आता पुलाखालून पाणी फार वाहून गेले आहेत. आता दोन्ही शिवसेना एकत्र येणे शक्य नाही". "अमित शाह यांना अफजल खान यांची उपमा दिली जाते. त्यांची मानस्थिक स्थिती बिघडली आहे. मी कितीही प्रयत्न केला तरी हे एकत्र येणार नाहीत," असंही ते म्हणाले.
"आता अशी अवस्था आहे की काँग्रेस जी सत्तेत होती त्यांचा साधा फोन देखील यांना नाही. यांना स्वतःच म्हणणारे आता कोणताही पक्ष नाही. उद्धव ठाकरे यांचे कान भरण्यात आले होते. आम्ही 8 ते 10 जण नाराज आहे, त्यांना जाऊ द्या. मात्र जेव्हा उठाव झाला तेव्हा कळाले की हे 40 होते. 25 वर्षे युतीत सडले म्हणाले, मात्र अडीच वर्ष ज्यांच्यासोबत काढले त्यांनी किती त्रास दिलं हे सांगत नाही," अशी टीकाही त्यांनी केली.
"त्यांच्याकडे एवढे रथी महारथी आहेत. त्यांच्याकडे विद्वानांची गँग आहे. ही उद्धव ठाकरे यांना सुधरू देणार नाही. मी गंगाधर गाडे यांनी घेऊन मातोश्रीवर गेलो होतो. भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न केला होता. ते चांगल्या प्रकारे यशस्वी देखील झाले," असंही ते म्हणाले.