Uddhav Thackeray Birthday : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी मातोश्रीवर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली... पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांची रीघ मातोश्रीवर लागली होती. प्रवेशद्वारापासून मातोश्री बंगल्यापर्यंत फुलांची सजावट करण्यात आली होती... भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स झळकत होते... उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यापासून देशभरातील इंडिया आघाडीच्या नेत्यांनी ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव केला...
शिवसेना शिंदे गटानं मात्र उद्धव ठाकरेंचा हा वाढदिवस चक्क काळा दिवस म्हणून पाळला.. काळे कपडे घालून उद्धव ठाकरेंचा निषेध केला... याचं कारण ठरला तो 27 जुलै 2005 चा तो दिवस... शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि ज्योती वाघमारे यांनी ट्विट करून काळा दिवस पाळण्यामागची भूमिका स्पष्ट केली.
27 जुलै 2005.... नुसत्या 'नावा'चा आणि 'प्रॉपर्टी'चा वारसा सांगणारे मौजमजेसाठी अंथरुणात खिळलेल्या बापाला पुरात 'एकटं' सोडून पळून गेले, तो हाच दिवस! आमचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यादिवशी मातोश्रीवर एकटे पडले होते...ज्यांनी महाराष्ट्र, हिंदुत्व, मराठी माणूस सांभाळला... पण त्यांच्याच पुत्राने 'नीतिमत्ता' सोडून, मातोश्रीवर बाळासाहेबांना 'एकटं' टाकून, कुटुंबीयांसोबत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पलायन केले. आणि तेच आता आपल्या चेल्यांसह, 'माझा बाप चोरल्या'ची आवई उठवतात... लाज वाटते का लाज ... जनाची ना मनाची तरी...? #काळादिवस असं ट्विट त्यांनी केलं.
दरम्यान, काळा दिवस पाळणा-या शीतल म्हात्रे आणि ज्योती वाघमारेंचा शिवसेना ठाकरे गटानं खरपूस समाचार घेतला. नेत्याचा वाढदिवस हा कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा दिवस.. मात्र उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसावरून नवं राजकारण सुरू झालंय... विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यात, याचीच ही नांदी मानली जातेय...