Maharashtra Weather : महाराष्ट्रात विचित्र हवामान बदल पहायला मिळणार आहे. सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत आहे. अशातच वातारवणात कमालीचे बदल पहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात अनवे जिल्ह्यांना हवामान खात्याने इशारा दिला आहे.
राज्यात एकीकडे 3 दिवस काही भागांत अवकाळी पाऊस पडतोय. तर दुसरीकडे आता काही जिल्ह्यात पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय. खासकरुन सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
एकीकडे राज्यात तापमानाचा पारा चढलाय. तर दुसरीकडे शेतक-यांसह सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यातील काही भागांत पुढील दोन दिवसांत अवकाळी पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटांसह वादळी आणि सोसाट्याच्या वा-यांचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30 -40 किमी प्रतितास वेगाने येण्याची शक्यता आहे.
राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढतच चाललाय. त्यामुळे गरज नसल्यास घराबाहेर पडणं टाळा. कारण, सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. करमाळाजवळील जेऊरमध्ये 42.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालीय. तर राज्यासह मराठवाड्यातील परभणी, नांदेड, बीड, उदगीरमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलंय. त्यामुळे नागरिक उकाड्यानं हैराण झालेत. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केले आहे.
अमरावतीत विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस बरसला. यामुळे गहू, संत्रासह भाजीपाला पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. अवेळी होत असलेल्या पावसामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत पडले आहेत. तर पावसामुळे शहराच्या अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. तसंच नागरिकांनी तारांबळ उडाली. वाशिम जिल्ह्यातही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तापमान 40 अंश सेलसियस असताना दुपारी जिल्ह्यातील काही ठिकाणी अचानक विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. उकाड्यानं हैराण नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला. मात्र पावसामुळे आंबा बागांसह उन्हाळी पिकांना फटका बसणार असल्यानं, शेतक-यांची चिंता वाढली आहे.