मुंबई : एकमेकांचे कट्टर विरोधक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे हे एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणाच्या भूमीपूजनाच्या निमित्ताने दोघे एकत्र येण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळमध्ये २३ जूनला नितीन गडकरी, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या हस्ते या चौपदरीकरणाचं भूमीपूजन आहे. या कार्यक्रमाला स्थानिक आमदार नितेश राणे आणि विधान परिषदेचे आमदार म्हणून नारायण राणेंनाही निमंत्रण आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर असण्य़ाचा दुर्मिळ योग जुळून येण्याची शक्यता आहे.
तब्बल १२ वर्ष म्हणजे एका तपानंतर हा योग जुळून येण्याची शक्यता आहे. ठाकरे-राणे कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर 2005 साला नंतर पहिल्यांदाच ते जाहीरपणे एकमेकांना सामोरे जातील. सिंधुदुर्गात आलेल्या गडकरी-फडणवीस यांना राणे पाहुणचारासाठी घरी आमंत्रित करु शकतात. या कार्यक्रमानिमित्तान रंजक घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे.