मोदी सतत जगभर फिरतात म्हणून मेरा देश बदल रहा है घोषणा, उद्धव ठाकरेंचा टोमणा

उद्धव ठाकरे बुधवारी बीडच्या दौऱ्यावर होते. यावेळी एका जाहीर सभेत त्यांनी राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला.

Updated: Jan 9, 2019, 01:24 PM IST
मोदी सतत जगभर फिरतात म्हणून मेरा देश बदल रहा है घोषणा, उद्धव ठाकरेंचा टोमणा title=

बीड - शेतीला पाणी नाही, गुरांना चारा नाही, युवकांना रोजगार नाही, पीकविमा योजना भरल्यावर नुकसान भरपाई मिळत नाही. मग कुठे देश बदलतोय, असा प्रश्न विचारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली. तुम्ही नव्या देशात जाता म्हणून मेरा देश बदल रहा है म्हणता, असा टोमणाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. बीडमध्ये जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, मग युतीचे बघू याचा पुनरुच्चार केला. 

उद्धव ठाकरे बुधवारी बीडच्या दौऱ्यावर होते. यावेळी एका जाहीर सभेत त्यांनी राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला. सरकार नुसता घोषणांचा पाऊस पाडते आहे. तो बंद करा आणि घोषणांच्या अंमलबजावणीला सुरुवात करा, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या. पण त्यातून शेतकऱ्यांचे भले झाले नाही. कर्जमाफी झाल्याचे सर्टिफिकेट हातात आले पण कर्जमाफी अद्याप झालेली नाही. सौभाग्य योजना, मोफत वीज जोडणी या सगळ्या फसव्या योजना आहेत. खोटं बोलून शेतकऱ्यांना फसवण्याचे काम सरकार करते आहे. जरी मी सरकारमध्ये असलो, तरी शेतकऱ्यांसाठी सरकारला याचा जाब विचारण्याचे काम मी करतच राहणार. खोटं बोलून एकही पद घेऊ नका, अशी शिवसेनाप्रमुखांची शिकवण होती आणि आम्ही त्याच मार्गावरून पुढे जात आहोत. सत्तेमध्ये असलो तरी आम्ही माणुसकी कधीच विसरू शकत नाही. माणूसपण आम्ही कधीही सोडणार नाही. निवडणुका येतील आणि जातील. निवडणुकीत काय करायचे हे तुम्हीच ठरवा, असे त्यांनी उपस्थितांना सांगितले.

गेल्या साडेचार वर्षात हे सरकार ना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले ना राम मंदिराचा प्रश्न यांना सोडवता आला. नुसता घोषणांचा बुडबुडा सोडून काहीच होणार नाही. त्या घोषणांची अंमलबजावणी करायला हवी. शेतकऱ्यांना पीडा असेल तर मी शेतकऱ्यांविरोधात बोलतच राहणार, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.