नाशिक : नाशिक येथे महापालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलेले तुकाराम मुंढे यांनी नाशिकमध्ये सेवेसाठी आणि जनता केंद्र बिंदू मानून शहरांचे काम केले जाईल, असे सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांशी नाशिकबाबत चर्चा झाली असून शहराचा सामाजिक, आर्थिक विकास करण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत, असेही ते म्हणाले.
पदभार स्वीकारल्यानंतर मुढें यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘नागरिकांच्या सेवेसाठी आणि जनता केंद्र बिंदू मानून शहराचे काम केले जाईल. ई गव्हर्नन्स तक्रार अर्ज दिल्यास तातडीने निकाली निघेल. नागरिक ठेकेदार वा पदाधिकारी यांनी फाईल ट्रॅक करू नये’, असे आढळल्यास विभाग प्रमुखांवर कारवाई होणार आहे.
अधिकाराचा वापर सार्वजनिक हित पाहून करण्याचे आदेश दिले जातील. रिझल्ट ओरिएन्टेड काम न केल्यास कारवाई केली जाणार आहे. आधी शहरात पाहणी करणार. संवेदनशील कामे व्हायला हवेत. नाशिक शहर परिवहन बस सेवेचा अहवाल पुन्हा तपासणार आहे. सार्वजनिक बस सेवा शहराला आवश्यक असून आवश्यक गरजा पाहून कमीत कमी तोट्यात चालविण्याचा प्रयत्न करणार आहे.
राजकीय पदाधिका-यांसह कुणाचाही दबाव कर्मचा-यांवर नसेल याची अधिका-यांना ग्वाही देतो. शहरातील कामे स्वतः चेक करणार.
३१ मार्चपर्यंत प्रत्येक रहिवाशांनी कचरा विलगिकरण करावे. ५० मायक्रोन पेक्षा प्लास्टिक वापर पूर्णपणे बंदी करणार आहे. नागरिकांनी घाण न करून जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. महापालिका कठोरपणे आपले काम करणार आहे. नागरिकांना सार्वजनिक स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन आहे.
नाशिक महापालिका आयुक्तपदाची सूत्र आज तुकाराम मुंढे यांनी स्वीकारली आहेत, पहिल्याच दिवशी तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांना धक्का दिला आहे. तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली यात, अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने गणवेश न घातल्याने या अधिकाऱ्याला बैठकीतून बाहेर पाठवलं. अनिल महाजन हे अग्निशमन दलाचे अधिकारी गणवेशाशिवाय बैठकीत बसले होते, यावर तुकाराम मुंढे यांनी त्यांना बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले. हे ऐकून सर्व अधिकारी अवाक झाले.
मात्र, यानंतर काही वेळाने अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल महाजन हे गणवेशासह बैठकीत हजर झाले, यानंतर अनिल महाजन यांना पुन्हा बैठकीत तुकाराम मुंढे यांनी सामिल करून घेतले. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पहिल्याच दिवशी असा झटका दिल्याने अधिकारी वर्गही आता सावध भूमिका घेत असल्याचं दिसत आहे. एकंदरीत नाशिक महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा शिस्त लागणार असल्याची चर्चा आहे.