अहमदनगर : मुकं जनावर असलं म्हणून काय झालं, आईची माया काय असते, याचा प्रत्यय अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर गावात आला. अपघातानं हरवलेल्या पिल्लाला त्याच्या आईनं शोधून काढलं इतकंच नाही तर ती त्याला स्वत: सोबत घेऊनही गेली. ताटातूट झालेल्या बिबट्याची मादी आणि पिलाच्या मिलनाची ही खरीखुरी गोष्ट...
हे बिबट्याचं छकुलं अवघ्या काही दिवसांचं आहे... त्याला त्याची आई कोण हे कदाचित कळणार नाही... मुकं जनावर असल्यानं त्याला स्वत:ची ओळखही सांगता येणार नाही... अशा वेळी रानात हरवलेल्या या लेकराला त्याची आई कशी सापडणार? याचं उत्तर माणिकडोहच्या बिबट निवारा केंद्राकडे होतं...
आई आपल्या बाळाला कुठल्याही परिस्थितीत शोधून काढणार, याचा विश्वास त्यांना होता. हे पिल्लू ज्या ठिकाणी सापडलं त्याच ठिकाणी त्यांनी त्याला नेऊन ठेवलं... आणि जी अपेक्षा होती तेच घडलं. रात्रीच्या अंधारात आई आली आणि आपल्या काळजाचा तुकडा सोबत घेऊन गेली, अशी माणिकडोहाचे प्रकल्प प्रमुख डॉ. अजय देशमुख यांनी माहिती दिलीय.
डॉक्टर देशमुख आणि त्यांची टिम वाईल्ड लाईफ एसओएस या संस्थेसोबत काम करतात. मनुष्य आणि बिबट यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही जिवांच्या रक्षणासाठी ते सक्रीय असतात. या संस्थेनं अशा ५१ पिल्लांची त्यांच्या आईशी भेट घडवून आणलीय. या मादीला तिचं पिल्लू मिळालं नसतं तर ती चवताळण्याची शक्यता होती. आणि ते अतंत्य धोकादायक ठरलं असतं. अशा परिस्थितीत ही अनोखी भेट घडवून आणण्यात या जीवरक्षकांना यश आलंय. निर्वासित झालेल्या बिबट्यांच्या पिलांची हेच खरं पुनर्वसन...