Sanjay Raut Post on Social Media: राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मुख्यमंत्रिपदावरुन सस्पेन्स कायम आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला असला तरी, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार का? याबाबत स्पष्टता नाही. भाजपानेही अद्याप देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचे आरोप करत आहेत. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी 'पुढे काय होतं ते पाहा' असं सूचक विधान केलं आहे.
संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट शेअऱ करत पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. ज्याचं ईव्हीएम, त्याची डेमोक्रसी असा फोटो त्यांनी पोस्टमध्ये शेअर केला आहे. यावेळी त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "जनमत चोरणाऱ्याला देश आणि जनता कधीही माफ करणार नाही. पाहत राहा - पुढे काय काय होतं. जय हिंद!"
जनमत चूरानेवालेको देश और जनता कभी माफ नहीं करेगी.
देखते रहो; आगे क्या क्या होता है!
जय हिंद! pic.twitter.com/KxMKmz6dLs— Sanjay Raut (@rautsanjay61) November 28, 2024
उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर केलं असतं तर विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) मतदान 2 ते 5 टक्क्यांनी वाढलं असतं असा दावा अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. यावेळी त्यांनी लोकसभा जिंकल्यानंतर काँग्रेसमध्ये अती आत्मविश्वास निर्माण झाला असंही सांगितलं. तसंच काँग्रेसमध्ये 10 जण मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक होते असाही दावा केला.
स्वबळावर लढण्यासंबंधी विचारण्यात आलं असता अंबादास दानवे म्हणाले की, "मी काल ताकद निर्माण केली पाहिजे अशी भूमिका मांडली. स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कामला लागलं पाहिजे असं मी म्हटलं होतं. महाविकास आघाडीतून बाहेर पडलं पाहिजे असं मी म्हणालेलो नाही". पुढे ते म्हणाले, "महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही 33 जागा निवडून आलो. तेव्हाही तेच मतदार होते आणि आताही तेच मतदार आहेत. उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे गेलं असतं तर चार-पाच टक्के मतदान वाढलं असतं आणि सर्वांना फायदा झाला असता".
"काँग्रेसचे लोक तर कोणतं मंत्रिपद, खातं मिळणार याच्यावर चर्चा करत होते हे सत्य आहे. मुख्यमंत्रिपदासाठी तर 10 जण इच्छुक होते. उद्धव ठाकरेंचं नाव जाहीर झालं असतं तर मतं वाढली असती. काँग्रेसला जर त्यांचा मुख्यमंत्री हवा होता तर त्यांनी नाव जाहीर करायला हवं होतं. उद्धव ठाकरेंनी तुम्ही नाव जाहीर करा, मी पाठिंबा देतो म्हटलं होतं. पण तसंही झालं नाही," असं अंबादास दानवे म्हणाले. ठाकरे बंधू एकत्र येणार का? असं विचारलं असता त्यांनी आमच्याकडे तशी चर्चा नाही असं स्पष्ट केलं.