उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात चांगलीच फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. मी डॉक्टर नसतानाही मोठी ऑपरेशन केलीत असं सांगत मला हलक्यात घेऊ नका असा इशाराही दिला. मात्र त्यांचा हा इशारा नेमका कुणाला आहे याबाबत उत्सुकता आहे.
एकनाथ शिंदेंनी विधानसभा निवडणूक जिंकली, शिवसेनेचे बहुतांश आमदार एकनाथ शिंदेंकडं आहेत. एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तरीही एकनाथ शिंदे मला हलक्यात घेऊ नका असं सांगत आहेत. एकनाथ शिंदेंचा हा इशारा नक्की कुणासाठी आहे याची चर्चा सुरु झाली आहे. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ठाण्यातल्या किसननगर भागात हे भाषण केलं. या भाषणात एकनाथ शिंदे कभी झुकता नही झुकाया सबको अशी डायलॉगबाजीही त्यांनी केली.
उपमुख्यमंत्री झालो तरीही आपलं महत्व कमी झालं नसल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला आहे. वाढदिवसाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करुन शुभेच्छा दिल्या यावरुन आपलं महत्व अजूनही कायम आहे असं सांगायलाही ते विसरले नाहीत.
माजी खासदार राजन विचारेंनी एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्यावर पलटवार केला आहे. कोणी कुणालाही हलक्यात घेत नाही. कुणाचं काय आहे ते प्रत्येकाला माहिती असल्याचा टोला राजन विचारेंनी लगावला आहे. एकनाथ शिंदेंच्या या भाषणात त्यांनी खूपच टाळ्या मिळवल्या. एकनाथ शिंदेंची ही डायलॉगबाजी टाळ्या घेण्यासाठी होती की त्यांची कोंडी करणा-या स्वकियांसाठी होती याची चर्चा ठाण्यापासून मंत्रालयापर्यंत सुरु झाली आहे.